‘युवा सेने’चे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील खाऊगल्ल्या आणि हॉटेले दिवसरात्र सुरू ठेवावीत, अशी सूचना केल्यानंतर त्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. न्यूयॉर्क, लंडन तसेच भारतातही इंदौरसारख्या शहरांमध्ये रात्रभर खाण्यापिण्याची सोय उपलब्ध असते. मग मुंबईत का असू नये, असा आदित्य ठाकरे यांचा सवाल आहे. येत्या गुरुवारी पालिकेत हा प्रस्ताव येणार आहे. बहुमताच्या जोरावर तो मंजूर होईलही. त्यानंतर तो राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठविला जाईल. तेथे काय होईल ते आता सांगणे कठीण आहे. मुंबईत पदपथाच्या आश्रयाने राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच रात्री-अपरात्री काम संपवून घरची वाट धरणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. या मुंबईकरांना रात्री-अपरात्री भूक लागल्यास पोटाची खळगी भरण्याची काहीच सोय नाही. रात्रभर हॉटेले सुरू ठेवण्यात ‘मुंबई दुकाने आणि आस्थापना कायदा’ (गुमास्ता कायदा) आणि ‘मुंबई पोलीस कायदा’ यांचा अडथळा आहे. मुंबई रात्री उशीरापर्यंत जागी असते. खाऊगल्ल्या, हॉटेले रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात काहीही गैर नाही. मात्र त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
’  सद्यस्थिती
मुंबईत अनेक रेल्वे स्थानकांच्या बाहेर व अन्यत्र खाद्यपदार्थाच्या गाडय़ा नियम धाब्यावर बसवून रात्री २-३ पर्यंत सुरू असतात.  चहापासून आईस्क्रिमपर्यंत सर्व काही तेथे मिळते. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बिनदिक्कत या गाडय़ा सुरू राहतात. कोटय़धीश ते भुरटे चोर असी सर्व थरातील मंडळी येथे क्षुधाशांतीसाठी येतात. या गाडय़ा अधिकृतपणे रात्रभर सुरू राहिल्यास पोलिसांना ‘कमाई’वर पाणी सोडावे लागेल.
’ मागणीत धोकाही!
यापूर्वी काही रेस्टॉरंट, बार आणि अन्य व्यावसायिकांनी रात्री उशीरापर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारचे दरवाजे ठेठावले होते. त्यावर सरकारने गृह विभागाचे मत विचारात घेतले. पोलिसांची अपुरी संख्या व कायदा आणि सुव्यवस्थेचा संभाव्य प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने प्रत्येक वेळी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. खाऊगाडय़ा रात्रभर सुरू ठेवल्यास पोलिसांवर कमालीचा ताण येऊ शकतो. मारामाऱ्या, लुटमारीचे प्रकार वाढू शकतात.
’ ब्रिटिशकालीन कायदा
गुमास्ता कायदा १९४८ मध्ये अंमलात आला. ब्रिटिश काळातील परिस्थितीनुरूप हा कायदा तयार करण्यात आला आणि आजतागायत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या ६५ वर्षांत मुंबई आमूलाग्र बदलली आहे. लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ही बदलती परिस्थिती आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. एकेकाळी मुंबई रात्री आठ-साडेआठच्या सुमारास सामसूम होत असे. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करायला हवी, असे मत पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
’ गुमास्ता कायदा काय म्हणतो?
मुंबईमधील प्रत्येक व्यवसाय, कंपन्यांचा कारभार, दुकाने आणि आस्थापने गुमास्ता कायद्यानुसार चालतो. या कायद्यात प्रत्येक व्यावसायाची वेळ नेमून देण्यात आली आहे. या कायद्यात विविध व्यवसायांची पाच श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. दुकाने, वाणिज्य संस्था, निवासाची व्यवस्था असलेली हॉटेल्स, केवळ खाण्याची व्यवस्था असलेली रेस्टॉरंट, चित्रपटगृह अशी ही वर्गवारी आहे. ‘दुकाने’ या श्रेणीमध्ये किराणामालाचे दुकान, फास्टफूड सेंटर, अन्य छोटी-मोठी दुकाने आदींबरोबर खाऊगल्ल्यांचाही समावेश आहे. या श्रेणीतील आस्थापने रात्री ८.३० वाजता बंद करावी लागतात. तर रेस्टॉरंट १२.३० पर्यंत सुरू ठेवता येतात. परंतु पोलीस परवान्यानुसार हे रेस्टॉरंट रात्री १.३० पर्यंत खुले ठेवता येते.
धनंजय पिसाळ (गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
लोकांसाठी एखादी सुविधा होत असेल तर त्याला आमचा पािठबा असेल. मात्र २४ तास दुकाने सुरू ठेवण्यामुळे नेमका किती टक्के लोकांना लाभ होतो आण त्यामुळे संबंधित यंत्रणांवर किती ताण पडतो हे पाहूनच निर्णय घ्यायला हवा. आधीच मुंबई असुरक्षित होत आहे. त्यात रात्रभर सुरू राहिलेल्या गाडय़ांमुळे नशेबाजांचे फावणार नाही, हेदेखील पाहावे लागेल. या दुकानांमुळे व तेथे आलेल्या ग्राहकांमुळे रहिवाशांनाही त्रास होऊ शकतो.
 रईस शेख (गटनेते, समाजवादी)
रात्रीची मुंबई पाहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी विशिष्ट भागात अधिकृत दुकानांना २४ तास सेवा देण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात बदल करण्यास आमचा पािठबा आहे. मुंबईत पर्यटन वाढणे, स्थानिकांच्या हिताचे आहे. जगभरातील शहरांमध्ये ‘नाइट लाइफ’ असते. केवळ सुरक्षेच्या मुद्दय़ावर अडवणूक करून पर्यटनाचा विकास रोखणे योग्य नाही.
 दिलीप लांडे (गटनेते, मनसे)
यासंदर्बात सुरक्षायंत्रणा, पोलीस, पालिका यांना नेमकी काय भूमिका बजावावी लागेल आणि त्यामुळे लोकांना किती फायदा होईल, याचा अभ्यास केल्यावरच या संबंधी मत नोंदवता येईल. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव हाती पडल्यावरच त्यावर भाष्य करता येईल. या प्रस्तावामागे काही विशिष्ट लोकांचाच फायदा होत नाही ना, हेदेखील पाहावे लागेल.
मकरंद नार्वेकर, पालिका विधी समिती अध्यक्ष
 ‘मुंबई देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. विदेशात जशी रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू असतात तशी ती मुंबईतही असावीत. मात्र त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.