पिंपरी पालिकेतील औषध विभागाचे व्यवस्थापक सुहास काकडे यांचे तडकाफडकी निलंबन केल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. काकडे यांना बळीचा बकरा करण्यात आला असून खरे सूत्रधार वेगळेच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असतानाच आयुक्तांनी चौकशीत तसे सिध्द झाल्यास त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे. खरेदी नाटय़ातून घडलेल्या या प्रकरणात राजकीय हितसंबंध असले तरी चौकशी समिती कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
यशवंतराव चव्हाण रूग्णालय, तालेरा व भोसरी रूग्णालयाकरिता आवश्यक असलेले ‘एनएसटी’ मशिन खरेदीसाठी ई-निविदा नोटीस प्रक्रिया सुरू करण्यात आली व खरेदीपूर्वीच त्यात काही आक्षेपार्ह बाबी असल्याचा ठपका ठेवून काकडे यांना दोषी ठरवण्यात आले. अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी काकडे यांच्या निलंबनाचे आदेश दिले. वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांमधील पराकोटीला गेलेले हेवेदावे व धंदेवाईक सत्ताधारी नेत्यांचे ‘अर्थ’ कारण यामागे आहे, असे मानले जाते. काकडे यांना कारणे दाखवा नोटीस न बजावता, त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देताच त्यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर एका निवेदनाद्वारे त्यांनी आपली बाजू आयुक्तांकडे मांडली. त्यात अधोरेखित केलेल्या मुद्दय़ांमध्ये तथ्य वाटल्याने व खरे सूत्रधार वेगळेच असल्याच्या संशयास पुष्टी मिळाल्याने आयुक्तांनी भांडार विभागप्रमुख डॉ. उदय टेकाळे व मुख्य लेखापाल भगवान घाटगे यांची चौकशी समिती नियुक्त केली.
चौकशी समिती सर्व बाबी तपासून घेईल व खऱ्या गोष्टी कागदावर येतील, असा विश्वास आयुक्तांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकरणात राजकीय दबावामुळे फाईलींचे राजकारण झाले असेल किंवा वरिष्ठ अधिकारी दोषी असल्यास चौकशीत ते स्पष्ट होईलच. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली व चौकशी समितीवर राजकीय दबाव येणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.