पोट्रेट, लॅण्डस्केप, स्टील लाईफ अशा विविध प्रकारच्या चित्रांसाठी विविध संस्थांच्या स्पर्धामध्ये पुरस्कार मिळविणारे तरुण चित्रकार पंकज बावडेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन गुरुवारपासून जहांगीर कला दालनातील टेरेस कला दालनात भरविण्यात आले आहे. पंकज बावडेकर यांचे पहिले एकल प्रदर्शन आहे. महेश्वर येथे होळकरांच्या आमंत्रणावरून गेले असताना तिथले वाडे, मंदिरे, तेथील रेवा सोसायटीमध्ये केले जाणारे हॅण्डलूम कपडे तयार करण्याचे काम पाहून त्यांचे जलरंग, तैलरंगात केलेली चित्रे प्रस्तुत प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्याशिवाय पोट्र्रेटही मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन १७ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
‘नोस्टॅल्जिया १४’  
जयंता भट्टाचार्य, रूबी कर्माकर, समरजित बिस्वास, अमितकुमार डे, आशा देब्बार्मा अशा कोलकातास्थित चित्रकारांचे समूह चित्र व शिल्पकृतींचे प्रदर्शन ‘नोस्टॅल्जिया १४’ सध्या जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. अ‍ॅक्रिलिक, तैलरंग, मिक्स मीडिया इत्यादी माध्यमातील चित्रे तसेच ब्रॉन्झ आणि मीक्स मीडियामधील शिल्पकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून भारत कला केंद्रातर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
‘सिक्स्थ सेन्स’  
रतन कृष्ण शहा, अमित कुमार, रमेश थोरात, संजय कुमार श्रीवास्तव, अंकित पटेल, असित पटनाईक या सहा कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘सिक्स्थ सेन्स’ १२ एप्रिलपासून  काळा घोडा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कला दालनात भरविण्याात येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाणार आहे. उर्जा व्यासपीठ या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात येत असून काळ, शक्ती, मुक्ती, संवेदना, नातेसंबंध, शांततेचे दर्शन या कलाकृतीच्या माध्यमातून अनुभवता येईल. समाजातील विविध अंतरंग, बदलते स्वभाव, स्त्री सौंदर्य इत्यादी चित्रण सिक्स्थ सेन्स या कला प्रदर्शनातील चित्रे व शिल्पे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. विविध सहा कलावंतांच्या विविध शिल्पकृती, चित्रकृती यात पाहायला मिळणार असून १५ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.  
‘साज-ए-बहार’
शास्त्रीय गायनाच्या मैफली मोठय़ा प्रमाणावर रसिकांना ऐकायला मिळतात. परंतु, फक्त शास्त्रीय वादनाची दिग्गजांनी सादर केलेली मैफल ऐकण्याची संधी मिळणे दुर्मीळ असते. चित्रवीणा, सेलो, सतार, तबला अशा वाद्यांचे दिग्गजांनी केलेले वादन ‘साज-ए-बहार’ मैफलीत ऐकायला मिळेल. एनसीपीएतर्फे आयोजित ही मैफल एक्पेरिमेंटल थिएटरमध्ये १२ व १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. दक्षिण भारतीय संगीतातील सर्वात कठीण वाद्य चित्रवीणाचे वादन प्रथमच साज-ए-बहारमध्ये केले जाणार असून एन. रवीकिरण हे तरुण वादक करणार आहेत. सास्किया दी हास राव सेलो या वाद्यावर वादन करणार असून शुभेंद्र राव सतारवादन करतील. तर साबीर खान यांचा तबला ऐकण्याची संधी मुंबईकर शास्त्रीय वाद्यप्रेमींना मिळणार आहे. चित्रवीणा या वाद्याचे लहानपणीच वादन करणारे एन रवीकिरण हे चित्रवीणा रवीकिरण म्हणूनही ओळखले जातात. हे कठीण वाद्य प्रथमच मुंबईकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.