सुमारे दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या व प्रभारी अधिकाऱ्यांकडे पदभार असलेल्या जळगाव जिल्हा गृहरक्षक दलाच्या समादेशकपदी राजकीय पाश्र्वभूमी असलेली व्यक्ती नको अशी मागणी होत आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मानित दिलीप गवळी यांनाच पदावर संधी द्यावी, असे काही संघटनांचे म्हणणे आहे.
गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक असलेल्या कोळपकर यांचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे प्रभारी कार्यभार गेला. त्यांच्या बदलीनंतर अपर अधीक्षक इशु सिंधू यांच्याकडे प्रभारी म्हणून ही जबाबदारी दिली गेली. सिंधू यांच्या बदलीनंतर अपर अधीक्षक एस. आर. तडवी यांच्याकडे सध्या या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्तींनीच हे पद भूषविल्याने गृहरक्षकांमध्ये नाराजी आहे. या व्यक्ती संघटनेसाठी पुरेसा वेळच देऊ शकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दिलीप गवळी यांना संधी देण्याविषयी मतप्रवाह आहे. गवळी हे १९८८ पासून संघटनेत पूर्णवेळ संबंधित आहेत. सध्या ते द्वितीय जिल्हा समादेशक असून राज्य परिवहनच्या सेवेत असूनही त्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत अनेक राष्ट्रीय पारितोषिके पटकावली आहेत. २००४ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.