हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. तथापि जनसुराज्यशक्ती पक्ष स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असेल, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.    
वारणाचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब कोरे यांच्यापासूनच आम्ही केवळ शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. तरीही शेट्टी वारणा परिसरात येऊन हातघाईची भाषा बोलतात. त्यांनी अशी भाषा करण्याऐवजी आमच्या कोणत्याही संचालकांना हात लावून दाखवावा असा उल्लेख करून जाधव म्हणाले, वारणा साखर कारखाना, दत्त आसुर्ले-पोर्ले कारखाना या पन्हाळा तालुक्यातील साखर कारखान्यांमध्ये खासदार शेट्टी यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून संघर्ष चालविला आहे. या संघर्षांला तोंड देत आम्ही कारखाने चालवत आहोत. प्रसंगी हातात काठय़ा घेऊन पहारा द्यावा लागत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार शेट्टी यांना विरोध करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष केला असल्याचेही त्यांनी सांगितले. सहकारी साखर कारखान्यांविरोधात आंदोलन तापविणारे खासदार शेट्टी खासगी कारखान्यांसमोर नमते घेतात, अशी टीका त्यांनी केली. हातकणंगले पंचायत समितीत घडलेल्या राजकारणाचा उल्लेख करून ते म्हणाले, जनसुराज्य शक्ती पक्षाला उपसभापतिपद आयते मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुटीरतेचा आम्ही फायदा घेतला.भाजप-शिवसेनेचे सदस्य आमच्या सोबत असले तरी तो स्थानिक पातळीवरचा विषय असून पक्षाच्या राजकीय धोरणात कसलाही बदल झाला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.