केंद्रातील ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ (युपीए) शासनाचे विविध घोटाळे आणि भ्रष्टाचार प्रसार माध्यमातून गाजत आहेत. परळ येथील एका हॉटेलचालकाला मात्र या घोटाळ्यांची माहिती हॉटेलच्या बिलावर छापणे चांगलेच महागात पडले. ‘यूपीए’च्या घोटाळ्यांची यादी बिलावर छापल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या हॉटेलसमोर निदर्शने तर केलीच; वर काही काळ हॉटेल बंदही ठेवायला भाग पाडले.
परळच्या ‘केईएम’रुग्णालयासमोरील ‘आदिती’ हॉटेलच्या मालकाने ग्राहकांना द्यायच्या बिलावर ‘यूपीए’ शासनाच्या काळातील कोळसा घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा आदींचा उल्लेख केला होता. ‘यूपीए’शासन या घोटाळ्यातील पैसे खात असून इकडे वातानुकूलित हॉटेल्सना मात्र सेवा कर लागू करून महाग करत आहे, असे आपले भाष्यही त्यावर केले होते. या हॉटेलमध्ये अशी बिले दिली जात असल्याचे कळताच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल बंद करणे भाग पाडले. हॉटेलच्या मालकाने बिलावर असा मजकूर छापून यूपीएची बदनामी केली. हा सर्व प्रकार आपण काँग्रेसच्या नवी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्याकडून हा विषय आमच्याकडे पाठविण्यात आला, असे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
हॉटेलच्या देयकावर जे काही प्रसिद्ध केले गेले ते माझे स्वत:चे मत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे केंद्रातील शासनाबद्दल माझे मत मी व्यक्त केले. केंद्रातील शासनाने वातानुकूलित हॉटेल्सचा सेवाकर वाढविल्यामुळे आपल्याला नुकसान सोसावे लागत असून हॉटेलमधील वातानुकूलित विभाग बंद करावा लागला आहे. १५ दिवसांपासून आपण ही देयके ग्राहकांना देत आहोत. काही ग्राहकांनी यावरून आपले अभिनंदनही केले असल्याचे हॉटेल मालक श्रीनिवास शेट्टी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल मालकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमालकाने याप्रकरणी माफी मागितली असून तो उल्लेख काढून टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.