एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला प्रकरणी अडीच महिन्यापासून फरार असलेला मुख्य आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी शहरअध्यक्ष मंगलसिंग राजपूत यास मलकापूर शहर पोलिसांनी २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अटक केली. मलकापूर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आरोपीस २६ डिसेंबपर्यंत ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात घटनेची पाश्र्वभूमी अशी की, जमिनीच्या वादातून मंगलसिंग राजपूत व त्यांच्या साथीदारांनी संगनमताने मलकापूर येथील व्यावसायिक डॉ. महाजन व सचिन चवरे या दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यात मंगलसिंग व इतर यांच्याविरुध्द कलम ३०७ अन्वये शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. घटनेनंतर आरोपी फरार होते. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी प्रथम बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालय त्यानंतर नागपूर उच्च न्यायालय येथे अर्ज केले, मात्र दोन्ही न्यायालयांनी आरोपीचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
तब्बल अडीच महिन्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या नेतृत्वातील गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य आरोपी मंगलसिंग राजपूत याला त्याचे राहते गावी वरखेड शिवारात सकाळी १० वाजता अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस क ोठडी सुनावली आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक दिनेश बरडेकर करीत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 2:07 am