* ५० टक्के सवलतीचा निर्णय तात्पुरताच
* सांस्कृतिकमंत्र्यांचे ठोस आश्वासन नाहीच
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठी मालिकांच्या चित्रीकरणाला अद्यापही सापत्न वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे. ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका वर्षांसाठी ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्रालयाने घेतला होता. आता हा कालावधी गुरुवारी संपत असून यापुढे या मालिकेच्या चित्रीकरणासाठी हिंदी मालिकांसाठीचाच दर लागू होणार आहे. परिणामी, ही मालिका घाईघाईने गुंडाळावी लागण्याची शक्यता आहे, असे मालिकेचे निर्माता-दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी सांगितले.
‘उंच माझा झोका’ या रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावरील मालिकेचे चित्रीकरण गेल्या वर्षी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरू झाले होते. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी चित्रनगरीचे तत्कालीन व्यवस्थापक श्याम तागडे यांनी मराठी मालिकांसाठी सूट नसल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर राजकीय पक्षांच्या चित्रपट संघटनांनी हस्तक्षेप करत या वादाला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न केला होता. परिणामी ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका वर्षांसाठी ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्रालयाने दिले होते.
आता गुरुवारी ही मुदत संपत आहे. मात्र मालिकेचा बराचसा भाग अजूनही चित्रित होणे बाकी आहे. त्यातच ‘राधा ही बावरी’ या नव्या मालिकेचा सेटही आपण चित्रनगरीतच उभारला आहे. चित्रनगरीत मराठी निर्माते अजिबात फिरकत नव्हते. मात्र आता आपण काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आपल्याला सरकारी मदतीची तेवढीच गरज आहे, असे प्रधान यांनी सांगितले. मराठी मालिकांसाठी ही सवलत कायम राहावी, यासाठी आपण गेले दोन महिने सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहोत. मात्र देवतळे यांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
आता निर्मात्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्र्यांसमोर आम्ही आमचे प्रश्न मांडले आहेत, असे प्रधान म्हणाले.