जिल्ह्य़ात एकाचवेळी वेगवेगळ्या लहान-मोठय़ा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ातील वातावरण राजकीय झाले आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप-शिवसेना तसेच राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. महापालिकेच्या रिंगणातही तेच चित्र आहे.
महानगर पालिकेसाठी १५ डिसेंबरला तर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी रविवारी मतदान होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची स्थिती रात्र थोडी सोंगं फार अशी झाली आहे. महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार उभे असलेल्या ६५ प्रभागांमध्ये प्रचारावर भर दिला आहे. राष्ट्रवादीने सर्व ७० ठिकाणी उमेदवार उभे करीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेने ४० तर भाजपने १६ उमेदवार उभे केले आहेत. परिवर्तन पुरोगामी आघाडीने १३, समाजवादी पक्षाने १८ तर मनसेचे ३५ उमेदवार आहेत. लोकसंग्राम पक्षाने ५९ ठिकाणी उमेदवारी करताना महिलांना संधी दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसमोर शिवसेना-भाजपचे आव्हान आहे. शिरपूरमध्ये काँग्रेससाठी आ. अमरीश पटेल तर धुळे तालुक्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.