अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॉन क्रीमिलेअर, उत्पन्न तसेच जातपडताळणी दाखले बंधनकारक आहेत. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करण्याची १५ जून ही अंतिम मुदत असल्याने त्याआधी हे सर्व दाखले मिळावेत, अशी मागणी आ. वसंत गिते यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अभियांत्रिकीसाठी सध्या ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी इतर प्रमाणपत्रांबरोबरच नॉन क्रीमीलेअर व जातपडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. नॉन क्रीमीलेअर व उत्पन्नाचे दाखले दरवर्षी द्यावे लागतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जून महिन्यात मिळत असल्याने ती मिळाल्यावरच विद्यार्थ्यांनी नागरी सुविधा केंद्रात अर्ज केले आहेत. त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी १७ जून ही तारीख देण्यात आलेली आहे. तसेच जातपडताळणी प्रमाणपत्राच्या नोंदणी व इतर प्रक्रियांसाठी बराच कालावधी लागत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सेतू कार्यालयाबाहेर विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या रांगा प्रमाणपत्र घेण्यासाठी लागत आहेत. त्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा किंवा पिण्याचे पाणी यांसारख्या सुविधाही नाहीत, अशी तक्रारही आ. गिते यांनी केली आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करावयाची मुदत १५ जूनपर्यंतच असून पात्रता असूनही केवळ दाखले वेळेवर मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशास मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल घेऊन नॉन क्रीमीलेअर, उत्पन्नाचा दाखला व जातपडताळणी प्रमाणपत्रे तातडीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणीही गिते यांनी केली आहे.