रेल्वे मंत्रालयाने उपनगरीय तिकीटप्रणालीमधून सीव्हीएम कूपन्स हद्दपार केल्यानंतर प्रवाशांसमोरील अडचणींचा विचार करून आता रेल्वेने एटीव्हीएम यंत्रांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एटीव्हीएम यंत्रांवरून यात्राविस्तार तिकिटे काढणे शक्य नव्हते. मात्र नव्या प्रणालीनुसार एटीव्हीएम यंत्रांवरूनही यात्रा विस्तार तिकिटे काढणे शक्य होणार आहे. ‘क्रिस’ या संस्थेने असे एटीव्हीएम यंत्र बनवण्याची तयारी दर्शवली असली, तरी पश्चिम रेल्वेने या यंत्राच्या सुरक्षेबाबत काही शिफारसी केल्या आहेत. त्यामुळे ही यंत्रे सेवेत येण्यास विलंब लागत आहे.
सीव्हीएम कूपन्सचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा टक्का गेल्या काही वर्षांमध्ये नगण्य झाला असला, तरी यात्राविस्तार तिकिटांसाठी सीव्हीएम कूपन्स हा उत्तम पर्याय होता. सीव्हीएमच्या जागी आलेल्या एटीव्हीएम यंत्रामध्ये यात्रा विस्ताराचा पर्याय नाही. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. म्हणजे ठाण्यावरून नालासोपारा येथे उपनगरीय रेल्वेगाडीने जायचे असल्यास आणि ठाणे ते दादर मासिक पास असल्यास ठाण्यातील एटीव्हीएमवरून दादर-नालासोपारा या प्रवासाचे तिकीट काढणे सध्याच्या यंत्रणेत शक्य नाही.
त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेकडे याबाबत सूचना केल्या होत्या. रेल्वेने एटीव्हीएम सॉफ्टवेअरसह रेल्वेच्या अन्य तिकीट प्रणालींचे काम करणाऱ्या ‘क्रिस’ या संस्थेकडे या सूचना कळवल्या आहेत. त्यानुसार आता क्रिस एटीव्हीएमसाठी नवीन सॉफ्टवेअर बनवत आहे. मात्र हे सॉफ्टवेअर कोणी चोरू नये किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने सुरक्षाविषयक काही सूचना केल्या आहेत. या सूचनांचाही विचार करायचा असल्याने काही वेळ लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र लवकरच आता एटीव्हीएमद्वारेही यात्राविस्तार तिकिटे काढणे शक्य होणार आहे.