‘साहब, दो रुपया छुट्टा नहीं है..’ टॅक्सीच्या मीटरने २८ अठ्ठावीस किंवा ४८ रुपये भाडे दाखवले आणि आपण टॅक्सीवाल्याला ३० किंवा ५० रुपये दिले की, त्याच्याकडून येणारे हे हमखास वाक्य! या वाक्यानंतर प्रवासी कसा आहे, कितपत घाईत आहे, या गोष्टींवर उभय पक्षांमधील वाद किंवा सामंजस्य अवलंबून असते. मात्र आता उभयपक्षी सामंजस्यच राहावे, यासाठी टॅक्सीचालक प्रवाशांकडून टीपची अपेक्षा करत आहेत. पाश्चात्य देशांमध्ये टॅक्सीचालकाला टीप देण्याची प्रथा असली, तरी मुंबईच्या टॅक्सी चालकांचे वर्तन पाहता किमान मुंबईत तरी ही प्रथा कितपत रूढ होईल, याबाबत शंकाच आहे.
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी यांची भाडेवाढ झाल्यानंतर आता टॅक्सी चालकांच्या खिशात किमान भाडय़ापोटी १९ ऐवजी २१ रुपये खुळखुळणार आहेत. मात्र अनेक वर्षांनी झालेली ही भाडेवाढ अत्यल्प असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष अँथनी क्वाड्रोस यांचे म्हणणे आहे. इंधन खर्च, मुंबईतील रस्त्यांची स्थिती, त्यामुळे टॅक्सीच्या देखभालीच्या खर्चात वाढ झाली असून त्यादृष्टीने ही भाडेवाढ खूपच कमी आहे. त्यामुळे आम्ही आता प्रवाशांनाच टीप देण्याचे आवाहन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक टॅक्सीत अशा प्रकारची पत्रके लावण्यात येणार आहेत. जगभरात असा प्रकार चालतो, मग जागतिक शहर होऊ पाहणाऱ्या मुंबईत काय हरकत आहे, असे क्वाड्रोस यांचे म्हणणे आहे.
टीपबाबत जगातील विविध देशांमध्ये विविध संकेत आहेत. जपानमध्ये टीप घेणे, हा स्वत:चा अपमान मानतात. अमेरिकेत टीप न देणे, हा अपमान मानला जातो. मात्र बहुसंख्य देशांत टीप सर्रास दिली जाते. मुंबईतील टॅक्सी चालकांची ख्याती मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी जास्त असल्याने टॅक्सीचालक व प्रवासी यांच्यात नेहमी ‘प्रेमळ’ संवाद होत असतात. अनेकदा २८ किंवा २९ रुपये झाल्यानंतर ‘छुट्टा नहीं है’ असे सांगून टॅक्सीचालक वरचे पैसे आपल्याच खिशात टाकतात. मात्र आता हे पैसे प्रवाशांनी ‘रहने दो’ असे म्हणून द्यावेत, अशी टॅक्सीचालकांची इच्छा आहे.टीप द्यायलाही आमची ना नाही. एखाद्या महागडय़ा रेस्तराँमध्ये गेल्यावर सहज २०-३० रुपये टीप आम्ही ठेवतो. मात्र तेथे आम्हाला त्या दर्जाची सेवा मिळते. मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सीचालकांकडून कोणती गोष्ट तत्परतेने मिळत असेल, तर तो भाडे घेण्यासाठीचा नकार! टॅक्सी चालकांनी टीप मागण्याऐवजी स्वत:ची प्रतिमा सुधारल्यास प्रवासी स्वखुशीनेच टीप हातावर ठेवतील, असे प्रवासी सुधीर बागडे यांनी सांगितले.
तर, वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांच्या मते टीप देणे हा एक चांगला संकेत आहे. त्यामुळे प्रवासी आणि टॅक्सीचालक यांचे परस्परसंबंध सुधारतील. मात्र टॅक्सी चालकांनीही काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. टीप देणे अनिवार्य नसून स्वेच्छेचा भाग आहे. त्यामुळे अशी टीप दिल्यास एक चांगली प्रथा रूढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.