गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आतापर्यंत ४३७.४८ मिमी पावसाची नोंद झाली. त्याची सरासरी ८७.५० टक्के आहे. जूनच्या पावसाची सरासरी जिल्ह्य़ाने ओलांडली.
जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत पावसाची घेतलेली नोंद मिलिमीटरमध्ये, कंसात एकूण पावसाची सरासरी. हिंगोली २८.२८ (६५.२७), वसमत २५.१४ (१३२.४१), कळमनुरी २५.५० (७१.३१), औंढा नागनाथ १४.७५ (१०७.००), सेनगाव २२.००(६१.४९). जूनमध्ये पडणाऱ्या पावसाची सरासरी जिल्ह्य़ाने ओलांडल्याचे चित्र आहे. गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ५४.४० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याची सरासरी १०.८८ टक्के आहे.
जिल्ह्य़ाचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ५२ हजार ६०० हेक्टरचे आहे. सरासरी पर्जन्यमान ८९० मिमी आहे. खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७९ हजार ४६८ हेक्टर आहे. जिल्ह्य़ात सोयाबीन, कापूस, खरीप, ज्वारी, तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. चालू खरीप हंगामात सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र १ लाख ६५ हजार हेक्टर (४३ टक्के वाढ) असून, कापूस पिकाखालील क्षेत्र १ लाख २० हजार हेक्टर आहे. यात ७.०६ टक्के घट आहे. खरीप ज्वारी २ लाख ५० हजार हेक्टर, तूर ३० हजार २५० हेक्टर अशा प्रकारे कृषी विभागाने खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.