शनिवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची मोठी हानी झाली असून हरभरा, गहू तसेच संत्र्यासारख्या पिकांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक झाडे उन्मलून पडली, तर काही घरावरील व शाळेवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचेही नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, २४ तास वीज खंडित होती, त्यामुळे सर्वसामान्यांना त्याची मोठी झळ सहन करावी लागली. अनेक भागात अद्यापही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. विजेच्या तारा तुटल्याने वीज खंडित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वादळी पावसाने गहू, हरभरा या रब्बी पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकटाचे सावट निर्माण झाले आहे.