रिक्षा व्यावसायिकांवरील इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती विरोधात बुधवारी शहरातील रिक्षा बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. उद्या बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, शहरातील सर्व रिक्षाचालक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविणार आहेत.
कोल्हापूर शहरात आज सुमारे ९ हजार कुटुंबीयांचा चरितार्थ रिक्षा व्यवसायावर सुरू आहे. या महागाईच्या काळात रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याबाबत रिक्षाचालकांच्या वतीने आजपर्यंत विविध आंदोलने व मोर्चा यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठविला आहे. यातून सातत्याने कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. परंतु आजतागायत शासनाने रिक्षाचालकांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार केलेला नाही. या सर्वाचा उद्रेक म्हणून १० सप्टेंबर रोजी कोल्हापूर शहरात सर्व रिक्षाचालकांनी आपापल्या संघटनांसहित विराट मोर्चा काढून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी केली होती.
शहरात ७० टक्के रिक्षा शेअर ए रिक्षा पद्धतीने भाडे आकारणी करतात. तर २५ ते ३० टक्केच रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारणी करत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची हद्द फक्त ७ किलोमीटर असल्यामुळे रिक्षा व्यवसाय व त्यावरील उत्पन्नही नियंत्रित आहे. मीटर भाडेवाढ झाल्यानंतर रिकॉलिब्रेशनसाठी सुविधा शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे असल्याने दरवर्षी रिक्षा पासिंगसाठी मीटर पॉलिटेक्निकलसाठी ही शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथूनच करावे लागणार असल्याने हाही खर्च सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांना परवडणारा नाही. तसेच गेल्या १५ महिन्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयात जादा प्रवासी भाडे घेतले जात असल्याच्या तक्रारींचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे या रिक्षाचालकांवर होणारी अन्यायी कार्यवाही थांबवून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे आदेश तातडीने रद्द करण्याबाबत योग्य तो निर्णय घेणे व कारवाई करणे गरजेचे आहे.
या वेळी बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, राजू जाधव, रमेश पवार, सुभाष शेटे, राजू पाटील, नितीन दुधगावकर, ईश्वर चन्नी, मोहन बागडी, मधुसूदन सावंत, दिलीप मोरे आदी उपस्थित होते.