क्रेडिट कार्डाचा पिन कोड क्रमांक मिळवून भामटय़ाने सुमारे सोळा हजार रुपयांची ऑनलाईन खरेदी करून बुद्धनगरातील एका तरुणाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
आनंद दौलत साखरे (रा. बुद्धनगर) यांना त्यांच्या बँक खात्याचे विवरण मिळाले. ते पाहून त्यांना धक्काच बसला. १५ हजार ९९० रुपयांची खरेदी त्यांच्या क्रेडिट कार्डावरून झाली असल्याची नोंद त्या विवरण पत्रात होती. प्रत्यक्षात खरेदीच केलेली नसल्याने त्यांनी शोध घेतला. त्यांच्या मोबाईलवर ९ जुलैला सकाळी ७५३१८६४५७४ या क्रमांकावरून कॉल आला होता. आयसीआयसीआय बँकेचा कर्मचारी असल्याचा परिचय देत क्रेडिट कार्डाची मर्यादा वाढवायची असल्याचे सांगत पिन कोड विचारण्यात आल्याचे साखरे यांना आठवले. साखरे यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नागरिकांनी सावध राहून खात्री पटल्याशिवाय कुणालाही खाते क्रमांक, त्याचा पासवर्ड, क्रेडिट कार्डाचा पिन कोड वगैरे माहिती कुणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फसवणुकीची दुसरी घटना पाचपावली परिसरात १२ एप्रिल ते १७ नोव्हेंबर २०१२ या काळात घडली. मोहम्मद कासीम मोहम्मद अयुब (रा. रमाईनगर नारी रोड) यांनी शेख नदीम शेख बबु (रा. चारखंबा चौक आसी नगर) याच्या घरासमोरील भूखंड अकरा लाख रुपयात खरेदीचा सौदा केला होता. त्यापैकी पाच लाख रुपये त्याने शेखला दिले होते. कालांतराने हा सौदा रद्द केल्याचे शेखने मोहम्मदला सांगितले. दोन लाख रुपये त्याने परतही दिले. शिल्लक तीन लाख रुपये परत मागण्यास गेला असता शेखने अश्लील शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मोहम्मदने पाचपावली पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शेख बबु याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.