आजच्या तरुणाईला भावणाऱ्या ‘रॉक फ्यूजन’ संगीताचा वापर करून त्यांच्यात जाज्वल्य देशभक्तीचा हुंकार जागवण्याचा आगळा प्रयोग २७ मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सायंकाळी सात वाजता रंगणार आहे. तरुण संगीतकार संसृत सानू यांनी लिहिलेल्या कवितांमधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अन्य क्रांतिकारक यांचे जीवनकार्य आणि त्यांची जाज्ज्वल्य देशभक्ती उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘डायनामाइट शो’ या नावाने हा कार्यक्रम सादर होणार आहे.
कार्यक्रमात ‘रणयज्ञ उरी धगधगला’, ‘गर्जा स्वातंत्र्याचा हृदयी’, ‘वधुनी तया चाललो’, ‘धन्य जाहलो वाहूनी गं सर्वस्व माझे तुझिया चरणी’ आणि अन्य काही गाणी सादर केली जाणार आहेत. इलेक्ट्रिक गिटार, ड्रम्स, की बोर्ड आदी वाद्यांचा वापर केला जाणार आहे. काही गाण्यांना दृकश्राव्य निवेदन आणि नाटय़ाची जोड देण्यात येणार असून संसृत सानू यांच्यासह मुक्ता सोमण, प्रतीक देशपांडे, कौस्तुभ देशपांडे हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि  अन्य क्रांतिकारकांचे जीवन उत्कृष्ट राष्ट्रभक्ती आणि सहनशक्ती यांचा मिलाफ होता. हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीत यांच्या एकत्रीकरणातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, त्यांची राष्ट्रभक्ती या कवितांच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीपर्यंत या कार्यक्रमाद्वारे पोहोचविण्यात येणार आहे.

सावरकरांनी सातत्याने आधुनिकतेला, नव्या विचारांना प्राधान्य दिले होते. बदलत्या काळानुसार तरुणाईची संगीताबाबतची आवडही बदलली आहे. अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा संगीताच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनावर अधिक परिणाम होतो, असे मानले जाते. त्यामुळे या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
 रणजीत सावरकर,
 कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक