तालुक्यातील सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाची कोणतीच तयारी पूर्ण नसल्याचे उघड झाल्याने प्रांत अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामे त्वरित पूर्ण न केल्यास कारवाईचा इशारा दिला.
पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची गडावर कोणतीच तयारी पूर्ण नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाल्यानंतर पांडे संतप्त झाले. कामे त्वरित पूर्ण करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गडावर २० लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी बस स्थानक परिसरात दोन नियंत्रण कक्ष, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य, बांधकाम, विद्युत, पोलीस, दूरसंचार, वन आदी विभागांबरोबरच सप्तशृंगी गडाचे विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत यांना आपआपली जबाबदारी पार पाडण्याची व तयारीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या.
सुमारे दोन तास चाललेल्या या आढावा बैठकीत विविध समस्यांवर व उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली, बैठकीस पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ, तहसीलदार अनिल कुटे, विश्वस्त दिलीप वनारसे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.