विरोधकांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीला येत नसल्यामुळे महापौरांचा बुधवारी युतीच्या नगरसेवकांकडून निषेध करण्यात आला. जोपर्यंत प्रस्ताव पटलावर घेण्यात येत नाही, तोपर्यंत कामकाज होऊ देणार, असा पवित्रा विरोधांकडून घेण्यात आला. अखेर सभागृह नेते अनंत सुतार यांनी मध्यस्थी करून महापौरांना विनवणी करून येत्या महासभेत विरोधकांचे प्रस्ताव पटलावर घ्या, असे सांगून विरोधकांचे पुढील महासभेत प्रस्ताव घेण्यात येतील असे सांगितल्यानंतर विरोधकांचा विरोध मावळला.
वारंवार महापौरांना विनवणी करूनही विरोधकांचे प्रस्ताव पटलावर येत नाहीत. आज झालेल्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेविका कोमल वास्कर यांचा प्रस्ताव घेण्यात न आल्याने त्यांनी महापौरांसमोर ठिय्या मांडत निषेध व्यक्त केला. या वेळी सर्वच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापौरांवर झोड उडवत त्यांचे विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीला का आणले जात नाहीत, असा जाब विचारला. प्रभागातील तातडीची विकासकामे न केल्याने तेथे कोणती दुर्घटना होण्याची शक्यता असून ही कामे वेळीच मंजूर न केल्यास भविष्यात काही दुर्घटना झाल्यास त्याला महापौर जबाबदार असतील, असा आरोप नगरसेवकांनी या वेळी केला. या वेळी महापौरांनी विरोधकांची आक्रमकता लक्षात घेत सदर विषयांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर विरोधक अधिक आक्रमक झाल्याने सभागृहातील मोकळ्या जागेत खाली बसून महापौरांचा निषेध केला. तसेच जोपर्यंत विषय मंजुरीसाठी आणले जात नाहीत तोपर्यंत सभा सुरू करण्यास विरोध केला. त्यानंतर सभागृह नेते अनंत सुतार यांनी महापौरांना सूचना केली की पुढील महासभेत सर्वाचे विषय आणा. तसेच ते न आणल्यास आपण स्वत: पुढील सभेच्या वेळी सभागृहाबाहेर जाऊ असा इशारा दिला. त्यावर महापौरांनी त्यांना पुढील सभेत हे विषय आणण्याचे आश्वासन दिल्यावर सुतार यांच्या विनंतीनुसार विरोधकांनी जागेवर बसून सभा सुरू करण्यास सहकार्य केले.