युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’च्या शुभांरभाच्या निमित्ताने २० नोव्हेंबरला उपराजधानीत येत आहेत. या दौऱ्यासाठी प्रदेश आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी कामाला लागले असले तरी जाहीर सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आले नाही.
राज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात लागू केली जाणार असून त्याचा शुभारंभ सोनिया गांधी यांच्या हस्ते नागपुरात करण्यात येणार आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी आठ जिल्ह्य़ातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबीयांसाठी ही योजना लागू केल्यानंतर सर्व राज्यात ही योजना लागू करून अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते. मात्र या योजनेचा शुभारंभ सोनिया गांधी यांच्या हस्ते व्हावा आणि तोही नागपुरात, यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्रारंभी १ नोव्हेंबरला दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु, दिवाळी असल्याने लोकांचा प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता वाटल्याने तारीखेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. राज्यातील नेत्यांनी प्रयत्न केल्याने सोनिया गांधी यांचा दौरा २० नोव्हेंबरला निश्चित झाल्याच्या वृत्ताला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मात्र त्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम आलेला नाही.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात सोनिया गांधी यांची जाहीर सभा शहरात घ्यावी वा ग्रामीण भागात याबाबत प्रदेश आणि शहर काँग्रेसमध्ये एकमत झालेले नाही. स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कस्तुरचंद पार्कवर सभा घेण्यासंदर्भात प्रदेश काँग्रेस कमिटीकडे मागणी केली आहे तर दुसरीकडे जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात सभा घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे पदाधिकारी मुकुल वासनिक प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी यांच्या दौरा जवळपास निश्चित झाला असून सध्या दिवाळीत व्यस्त असलेले पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते कामाला लागले आहे.
या संदर्भात शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या शुभारंभ नागपुरात होणार असून त्यासाठी सोनिया गांधी यांचा २० नोव्हेंबरचा दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्याच्यानिमित्त दोन ते तीन दिवसात प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीला केंद्रीय पदाधिकारी मुकुल वासनिक, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह आरोग्य राज्यमंत्री सुरेश शेट्टी, पालकमंत्री शिवाजीराव मोघे आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीची तारीख निश्चित झाली नाही. सोनिया गांधी यांची जाहीर सभा कुठे घ्यावी यासंदर्भातील निर्णय बैठकीत घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.