अकरावी प्रवेशाची लगबग सर्वत्र सुरू होण्याच्या मार्गावर असली तरी ज्या परीक्षेने या महाविद्यालयीन प्रवेशाचा मार्ग खुला झाला, त्या दहावीच्या निकालाबद्दल विद्यार्थी वर्गात फारसा संभ्रम नसल्याचे अधोरेखीत होत आहे. गुणांची पडताळणी वा उत्तरपत्रिकेची छायांकीत प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याच्या उपक्रमास नाशिक विभागात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद, हे त्याचे द्योतक. मार्च २०१२ मध्ये दहावीच्या परीक्षेला विभागातून प्रविष्ट झालेल्या १,८०,७७९ पैकी केवळ ५६८ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केले तर ३०० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायांकत प्रतीची मागणी केली. यावरून मंडळाच्या निकालाबद्दल पालक व विद्यार्थ्यांमध्ये फारशी साशंकता नसल्याचे लक्षात येते.
मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा नाशिक विभागातून १,८३,७८६ पैकी १,५४,१२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात पाच टक्क्यांनी वाढ झाली. आपल्याला मिळालेल्या गुणाबद्दल काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि त्यांचीही पुनर्मुल्यांकन करण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे. गुणपत्रिका शाळांमधून प्राप्त झाल्यानंतर त्याकरिता अर्ज करण्याची मुदतही यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. निकालाबद्दल संभ्रम असलेले विद्यार्थी विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करून आपली उत्तरपत्रिका पाहू शकतात. ही सुविधा उपलब्ध केली गेली असली तरी गतवर्षी म्हणजे मार्च २०१२ मध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यास त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. गतवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर विभागातून ५६८ अर्ज मंडळाकडे सादर झाले होते. त्यातील केवळ आठ विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाले. उर्वरित ५६० विद्यार्थ्यांचे निकाल ‘जैसे थे’ राहिल्याची माहिती खुद्द मंडळाने दिली आहे. एकूण प्राप्त अर्जापैकी गुणात बदल होण्याचे प्रमाण २.७२ टक्के तर गुणात बदल न होण्याचे प्रमाण ९७.२८ आहे. प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुणपडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी आहे. तशीच स्थिती उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींबाबत आहे. परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उत्तरपत्रिकेची छायाप्रत उपलब्ध करून दिली जाते. मार्च २०१३ पासून तर उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी ही व्यवस्था नसली तरी आपल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. नाशिक विभागातून छायाप्रतीसाठी केवळ ३०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ०.१७ टक्के असल्याचे मंडळाने म्हटले आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास दहावीच्या निकाल प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालक वर्ग बहुदा समाधानी आहेत, असेच चित्र निर्माण झाले आहे.