‘साब.. पिछले तीन महिनोंसे पगार नही मिला है.. औरत का मंगलसुत्र गिरवी रखकें दस हजार रुपया उठाया, उसीसे अबतक घर चलाया.. अब बच्चे भुके रहेंगे.. क्या करे..’ अश्रूंच्या धारा कशाबशा थोपवत तो सुरक्षा रक्षक बोलत होता. त्याच्याबरोबरच्या तेराही सुरक्षा रक्षकांच्या घरची परिस्थिती अशीच होती. टॉप्स या खाजगी सुरक्षा कंपनीचे हे कर्मचारी सांताक्रुझ, कलीना येथील ‘एअर इंडिया कॉलनी’त काम करतात. त्यामुळे त्यांच्या पगाराच्या मुद्दय़ावर सोसायटीचे सदस्यही फारसे काही करू शकत नव्हती.. ‘मनसे’च्या एका कार्यकर्त्यांच्या कानावर गुरुवारी ही गोष्ट पडली आणि चमत्कार झाला.. त्याच संध्याकाळी या सुरक्षा रक्षकांच्या खात्यात एक महिन्याच्या पगाराची रक्कम जमा झाली होती!
मुंबईत अनेक खाजगी सुरक्षा एजन्सी आहेत. त्यांच्याकडील सुरक्षा रक्षकांना पुरेसे प्रशिक्षणही नसते. लहानमोठय़ा सुरक्षा एजन्सीमध्ये त्यांची पिळवणूक तर होतेच, पण नामवंत खाजगी सुरक्षा संस्थांमध्येही त्यांना वेठबिगारासारखे राबविले जाते.  एअर इंडिया कॉलनीतील सुरक्षा रक्षकांच्या वेतनाच्या मुद्दय़ावरून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कलिनामधील एअर इंडियाच्या दोन्ही कॉलनीमधील सुरक्षा व्यवस्था काही वर्षांपासून खाजगी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. सध्या ही सुरक्षा व्यवस्था ‘टॉप्स’कडे असून एअर इंडिया कॉलनी क्रमांक दोनमध्ये सध्या तेरा सुरक्षा रक्षक व दोन सुपरवायझर यांच्याकडे कॉलनीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. येथील सुरक्षा रक्षकांनाच तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे हवालदिल झालेल्या या सुरक्षा रक्षकांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अनेकदा वेतन मिळण्यासाठी साकडे घातले तसेच ‘टॉप्स’च्या कार्यालयातही खेटे घातले. अखेर दिंडोशी येथील मनसेचे विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्याकडे हे प्रकरण गेले.
शाखाध्यक्ष भास्कर परब व शरद वाघ यांना सोबत घेऊन सुर्वे यांनी आरे कॉलनीतील रॉयल पाम येथील टॉप्सचे कार्यालय गाठले, आणि पगार का मिळत नाही, अशी विचारणा केली. रहिवाशांच्या सुरक्षएची काळजी घेणाऱ्या या सुरक्षा रक्षकांना पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा मात्र संकटात सापडली असून पैशाअभावी त्यांचे हाल होत असल्याने आजच्या आज किमान एक महिन्याचा पगार मिळाला पाहिजे व त्यांच्या खात्यात इसीएसद्वारे जमा करा अशी विनंती त्यांनी व्यवस्थापनाला केली, तेव्हा सुरुवातीला काहीशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. समजावणीच्या सुरातील विनंतीकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे जाणवताच त्यांनी ‘मनसे स्टाईल’ने विनंती केली, आणि अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सूत्रे फिरली. या सुरक्षा रक्षकांच्या खात्यात पगार जमाही करण्यात आला. पगार जमा झाल्याचे कळताच आनंदश्रू आवरत या सुरक्षा रक्षकांनी अरुण सुर्वे यांना ‘मनसे’ धन्यवाद दिले.