08 July 2020

News Flash

तुकारामांचे अभंग आता कोकणीत

अभंगांमधून सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यावर कोरडे ओढणाऱ्या संत तुकारामांचे काही निवडक अभंग आता लवकरच कोंकणीतही उपलब्ध होणार

| November 6, 2014 06:25 am

अभंगांमधून सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यावर कोरडे ओढणाऱ्या संत तुकारामांचे काही निवडक अभंग आता लवकरच कोंकणीतही उपलब्ध होणार आहेत. ‘सुंदर ते ध्यान-विठ्ठल विठ्ठल’ या नावाने हे पुस्तक येत आहे.
गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे माजी अध्यक्ष, गोवा साक्षरता अभियानाचे संचालक आणि गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करणारे पद्मश्री सुरेश आमोणकर यांनी ८० व्या वर्षी हे काम हाती घेतले आहे. या वयातही अत्यंत उत्साहाने, तळमळीने आमोणकर तुकारामांच्या अंभगांच्या कोकणी अनुवादाचे काम करत आहेत. 

तुकारामांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता अत्यंत परखड शब्दांत आपले म्हणणे मांडले. वैयक्तिक आणि सामाजिक ढोंगावर त्यांनी कठोर प्रहार केला. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा हा कवी आणि संत होता. आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीत त्यांचे लेखन आणि अभंग तंतोतंत लागू पडतात. त्यामुळे सद्य परिस्थितीतही ते विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने आपण हे काम हाती घेतले आहे, असे आमोणकर यांनी सांगितले.
तुकारामांच्या अभंगगाथेतून निवडक अभंग वेचून काढणे तसे कठीणच होते. साहित्य अकादमीने ‘तुकारामांची गाथा’प्रकाशित केली आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे पुस्तक, पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी काही तज्ज्ञांनी निवड केलेले अभंग यातून अभंगांची निवड करण्यास मदत झाली. संत तुकाराम यांच्यावरील http://tukaram.com या संकेतस्थळावर तुकाराम यांच्या काही अभंगांचा कोकणी अनुवाद आपण यापूर्वी केला होता. त्याचाही काही प्रमाणात उपयोग झाला. आत्तापर्यंत १५० अभंगांचा कोकणीत अनुवाद करून झाला असून आणखी पन्नास अभंगांचा अनुवाद करणार असून हे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2014 6:25 am

Web Title: tukaram poems in konkani language
Next Stories
1 समाजभान जपणारे महाविद्यालयीन महोत्सव
2 काश्मीरला आता जीवघेण्या थंडीची चिंता!
3 डेंग्यूपेक्षा तापाचे रुग्ण पन्नासपट!
Just Now!
X