सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती किंवा गटांमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन मोठा अनर्थ घडू नये, यासाठी अनेकदा काही सुज्ञ नागरिक त्यांच्यात समेट घडविण्यासाठी पुढाकार घेतात खरा, पण मूळ वाद बाजूला राहून वडय़ाचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकारही घडतात. अशाच प्रकारे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघांना चांगलाच धडा मिळाला आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याला मार असाच काहीसा प्रत्यय देणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना ३१ डिसेंबरच्या रात्री कळवा आणि मुंब्रा भागात घडल्या आहेत. त्या भांडणातील मध्यस्थी दोघांच्या अंगलट आली असून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत.
कळवा येथील पौंडपाडा परिसरात प्रदीप शालीकराम यादव (२७) राहत असून ३१ डिसेंबरच्या रात्री त्यांच्या घरासमोर उमेश शेख्यवार आणि अमित राम यांच्यात भांडण सुरू होते. या दोघांमधील वाद वाढू नये म्हणून प्रदीप यांनी पुढाकार घेत त्यांच्यात मध्यस्थी केली. मात्र, त्याचा उमेशला राग आला होता. यातूनच उमेश आणि त्याचे मित्र राहुल रामराज व दिलीप या तिघांनी प्रदीपला शिवीगाळ करत बांबूने मारहाण केली. तसेच दिलीपने धारधार शस्त्राने त्यांच्या पोटावर दुखापत केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहेत. दुसऱ्या घटनेत ३१ डिसेंबरच्या रात्री मुंब्रा भागातील हास्मत चौकात रेहान खान, रिझवान खान आणि समीर ऊर्फ सलमान हुसेन हे तिघे समीर या तरुणाला मारहाण करीत होते. उधार घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात येत होती. दरम्यान, हास्मत चौक परिसरात राहणारे इरफान अब्बास मुल्लाजी (३४) यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र, त्याचा राग आल्याने रेहान याने हातातील कुकरीने त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.