इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या उद्या, शुक्रवारी नागपुरात होणाऱ्या दीक्षांत समारंभात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ६ बंदिवानांना प्रथमच दीक्षांत समारंभात पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. मात्र या समारंभात मुंबई बॉम्बस्फोटामधील खटल्यात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेननला मात्र उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बंदिवानांसाठी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रम सुरू केले असून अनेक बंदिवान चार भिंतीच्या आत राहून शिक्षण घेत आहे. कारागृहातील एकूण सात बंदीवानांनी मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांमध्ये दोन महिला बंदिवानाचा समावेश आहे.
 विशेष म्हणजे या सात बंदीवानामध्ये मुंबई बॉम्बस्फोटात खटल्यात फाशीची शिक्षा झालेला याकुब मेननचा समावेश आहे. याकुब मेनन हा मागील काही वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात वास्तव्याला आहे.
या वास्तव्यात त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची एम.ए. इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण केली. या शिवाय कारागृहातील विविध उपक्रमात तो सहभागी झाल्याने त्याचा या दीक्षांत समारंभात सत्कार करण्यात येणार होता. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. फाशीची शिक्षा ठोठावलेल्या बंदिवानाला नियमानुसार ‘फाशी यार्ड’ परिसरातील बरॅकीतच ठेवले जाते. शिवाय त्याला कारागृहाच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही. अगदीत आणीबाणीचा प्रसंग वगळता त्याला बाहेर काढता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे पदवीचा मानकरी असलेला याकूब इतर बंदिवानासारखा समारंभात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा पदवीदान समारंभ उद्या, शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरूनानक भवनात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. एम.एम. पल्लम राजू यांना आमंत्रित करण्यात आले आहे.