ठाणे शहरातील गरीब वस्त्यांमधील गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळावे, याहेतूने ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला पहिला नाटय़ जल्लोष महोत्सव जानेवारी महिन्यात आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवासाठी युवकांची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत शहराच्या विविध भागांत १५ गट स्थापन करण्यात आले आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून जानेवारी महिन्यात नाटय़ जल्लोष महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जगदीश खैरालीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि रत्नाकर मतकरी यांच्या उपस्थितीत दोन बैठका पार पडल्या.
ठाणे शहरातील खारटन रोड, नागसेननगर, राबोडी, माजिवडा, मानपाडा, ढोकाळी, मनोरमानगर, सावरकरनगर, येऊर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, यशोधननगर आदी भागांतून नाटय़ जल्लोषमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांची गटबांधणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ गट स्थापन झाल्याची माहिती संस्थेच्या कार्यवाहक व गटबांधणी समिती संयोजक लतिका सु.मो यांनी दिली.
येत्या २० नोव्हेंबपर्यंत सर्व गटांची बांधणी पूर्ण करण्यात येणार असून हे गट महिनाभरात दैनंदिन जीवनातील भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर आपापल्या क्षमतेनुसार प्रत्येकी १५ ते २० मिनिटांच्या नाटिका सादर करणार आहेत.
नाटय़ रुपाचे लेखन, भाषा, नेपथ्य, संगीत आदीबाबत कोणतेही नियम तसेच बंधने नसतील.
तसेच युवकांनी आपापल्या भाषेत भावना व्यक्त करणे अपेक्षित आहे, असेही रत्नाकर मतकरी यांनी बैठकीत स्पष्ट केले. सिने-नाटय़ आणि मालिकांमध्ये देदीप्यमान कामगिरी
करणारे कलाकार या गटांना स्वमत-स्वभाव-स्वजाणिवा प्रभावीपणे अभिव्यक्त करण्यास मदत करणार आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी, उदय सबनीस, सुप्रिया विनोद, विजू माने, अरुंधती भालेराव आदींचा सहभाग असणार आहे.
गटबांधणी समितीसोबतच या महोत्सवाच्या आयोजनासाठी जिजासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे, वी नीड यु सोसायटीचे जयंत कुलकर्णी, जागचे मिलिंद गायकवाड, रंगकर्मी मकरंद तोरसकर आदींची ‘नाटय़ जल्लोष व्यवस्थापन समिती’ गठित करण्यात आली आहे, अशी माहिती रत्नाकर मतकरी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2014 रोजी प्रकाशित
गरीब वस्त्यांमधील कलावंतांना व्यासपीठ
ठाणे शहरातील गरीब वस्त्यांमधील गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळावे, याहेतूने ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला पहिला नाटय़ जल्लोष महोत्सव जानेवारी महिन्यात आयोजित केला जाणार आहे.
First published on: 30-10-2014 at 06:14 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A platform for artist from poor background