आधार कार्डचा उपयोग वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारतर्फे नियोजन केले जात असले, तरी पुणे शहरात मात्र आधार कार्ड देणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अकार्यक्षमतेने चालू असल्याचे चित्र आहे. हे काम शहरात चार संस्थांना देण्यात आले असले, तरी त्यातील दोन कंपन्या महापालिकेला सहकार्य करत नसल्याचीही माहिती समोर आली आहे.
देशात आधार कार्डचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी करून घेतला जाणार आहे. आधार कार्डावर संबंधित व्यक्तीच्या सर्व माहितीची नोंद होते. त्यामुळे यापुढील काळात सरकारकडून अनुदान, निवृत्तिवेतन, शिष्यवृत्त्या वा अन्य स्वरूपातील जी आर्थिक मदत नागरिकांना दिली जाईल, ती थेट आधार कार्डावर नोंदवण्यात आलेल्या बँकखात्यावर जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी पुण्यात दिली होती. या पद्धतीमुळे अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शक्य आहे. त्यामुळे पुढील वर्षांच्या अखेरीस देशातील सर्व जिल्ह्य़ात आधार कार्ड योजना राबवली जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.
या पाश्र्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या आधार कार्ड मोहिमेचा आढावा घेतला असता, चित्र समाधानकारक नसल्याची माहिती मिळाली. पुणे शहरात पहिल्या टप्प्यामध्ये १२ लाख ३६ हजार नागरिकांची नोंदणी या योजनेत झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र, आधार कार्डसाठीची नोंदणी कोणत्या भागात सुरू आहे, याची नागरिकांना माहिती होत नसल्याची मुख्य तक्रार आहे. तसेच आधार कार्डची व्याप्ती लक्षात घेता शहरात एकाचवेळी अनेक ठिकाणी केंद्र सुरू करणे आवश्यक असले, तरी सरासरी तीस चाळीस ठिकाणीच हे काम सुरू ठेवण्याचे नियोजन आहे आणि तेवढी केंद्रही शहरात सध्या सुरू नाहीत. महापालिकेने हे काम चार संस्थांना दिले असले, तरी त्यातील दोन संस्था महापालिकेला सहकार्य करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या दोन संस्था बदलून द्याव्यात, असेही पत्र महापालिकेने केंद्राला पाठवले आहे.
आधार कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया राबवणारी साडेतीनशे ते चारशे युनिट्स शहरात एकाचवेळी सुरू ठेवणे आवश्यक आहे. मात्र, तूर्त ऐंशी युनिट्स पुण्याला देण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन-दोन युनिट्सचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे चाळीस केंद्रांमध्ये हे काम सुरू राहू शकते. मात्र, दोन संस्था काम करत नसल्यामुळे केंद्रांची संख्याही निम्म्यावर आली आहे. त्यामुळे नागरिकांना आधार कार्ड देणारे केंद्र आपल्या भागात केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नगरसेवकांनीही या यंत्रणेबाबत तक्रारी केल्या असून शहरात एकाच वेळी दोन-तीनशे केंद्र सुरू केली, तरच हे काम वेगाने होऊ शकेल आणि नागरिकांचाही या मोहिमेला प्रतिसाद मिळेल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
प्रतिनिधी
आधार कार्डचा उपयोग वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारतर्फे नियोजन केले जात असले, तरी पुणे शहरात मात्र आधार कार्ड देणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अकार्यक्षमतेने चालू असल्याचे चित्र आहे. हे काम शहरात चार संस्थांना देण्यात आले असले, तरी त्यातील दोन कंपन्या महापालिकेला सहकार्य करत नसल्याचीही माहिती समोर आली आहे.
First published on: 27-11-2012 at 03:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadar card scheme work is going very slow