आम आदमी पक्षाची परिवर्तन यात्रा कार्यकर्त्यांच्या सहभागात शुक्रवारी छत्रपती चौकातून प्रारंभ झाली. आम आदमी पक्षाचे संस्थापक प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या विदर्भातील उमेदवारांच्या उपस्थितीने यात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अरविंद केजरीवाल, आपचे उमेदवार अंजली दमानिया (नागपूर), भावना वासनिक (अमरावती), प्रशांत मिश्रा (भंडारा-गोंदिया), विजय पांढरे (नाशिक) व आपचे शहर प्रमुख देवेंद्र वानखेडे यांचे छत्रपती चौकात आगमन होताच आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. उघडय़ा कारमध्ये उभे असलेल्या केजरीवाल यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेटारेटी केली. काही क्षणातच यात्रा प्रारंभ झाली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या आम आदमीच्या अभिवादनाचा केजरीवालांनी स्वीकार केला.
ही परिवर्तन यात्रा प्रतापनगर चौक, हिंगणा टी पॉईंट, व्हीआरसीई,  मानस चौक, टी पॉइंट मार्गे कस्तुरचंद पार्कवर पोहोचली. कार व बाईकने निघालेल्या यात्रेत कार्यकर्त्यांमध्ये पुरुषांसोबत महिलांचाही मोठा सहभाग होता. गाडय़ांचा ताफा आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी चौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. परिवर्तन यात्रेसोबत वाहतूक व्यवस्था सांभाळताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.