महाराष्ट्र एकता अभियान या सेवाभावी काम करणाऱ्या संस्थेने पहिल्यांदाच खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘आरोहण २०१२’चे आयोजन केले असून या स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवार, ४ डिसेंबर रोजी यशवंत नाटय़गृह माटुंगा येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. रसिकप्रेक्षकांना अंतिम फेरीत निवडलेल्या सहा एकांकिका पाहण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी माटुंगा वेल्फेअर हॉल येथे शनिवार-रविवारी पार पडली. प्राथमिक फेरीतील २८ एकांकिका स्पर्धेतून सहा एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. निशिगंध मुंबई या संस्थेची ‘लाडी’, इस्माईल युसूफ महाविद्यालयाची ‘माजुरडय़ा चिमणीचं बायपास’, रंगसंगती कलामंचची ‘श्रीराम लीला’,  प्रगती महाविद्यालयाची ‘तू काय मी काय’, उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाची ‘स्लाईस ऑफ लाईफ’ आणि विरारच्या वि. वा. महाविद्यालयाची ‘इमोशनल अत्याचार’ या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.