ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणात काही बदल केले आहेत. जिल्हास्तरावर पाच टक्के विनंती बदल्या करण्यास परवानगी दिली आहे. तसेच पाच वर्षे सेवा झालेल्यांनादेखील आपसातील बदल्यांनादेखील जिल्हास्तरावर परवानगी दिली आहे.
बदल्यांच्या धोरणात अंशत: बदल करणारा हा आदेश तीन दिवसांपूर्वी (दि. १८) काढण्यात आल्याची माहिती प्रथामिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब जगताप व सरचिटणीस बापूसाहेब तांबे यांनी दिली. या बदलासाठी संघाने प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. प्राथमिक शिक्षकांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांनाही हा बदल लागू आहे.
यापूर्वीच्या ५ एप्रिलच्या आदेशानुसार वरील चारही संवर्गाच्या जिल्हास्तरीय बदल्या होणार नव्हत्या, केवळ तालुकांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत. इतर संवर्गाच्या मात्र जिल्हा व तालुका पातळीवर, प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही प्रकारच्या १० टक्के बदल्या केल्या जाणार आहेत. शिवाय आपसातील बदल्यांना परवागनी दिली नव्हती, ती आता देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी ५ वर्षे सेवेची अट लागू करण्यात आली आहे. तसेच आपसातील बदल्या या बदल्यांच्या टक्केवारीत धरल्या जाणार नाहीत. आपसातील बदल्यांसाठी कर्मचा-यांना २५ एप्रिलपर्यंतच अर्ज करता येणार आहेत. परंतु आपसातील बदलीसाठी कर्मचा-यांना बदलीपूर्वीचे ठिकाण किंवा स्वत:चे गाव मागता येणार नाही.
दोन वर्षे प्रशासकीय बदलीने तालुक्याबाहेर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा स्व:तालुक्यात येण्याची शक्यता मावळल्याने, ही परवानगी मिळावी यासाठी संघाचे प्रदेश पातळीवरील शिष्टमंडळ पुढील आठवडय़ात ग्रामविकासमंत्री व खात्याच्या सचिवांना भेटणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.