फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या आणि दुसऱ्या संस्थेने केलेल्या गंभीर आरोपावरून विद्यापीठाच्या पूर्व परवानगीने सेवा मुक्त करण्यात आलेल्या प्राचार्याची अन्य महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती करणे पूर्णत: अनुचित असल्याचा निर्वाळा देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी यवतमाळच्या बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून संस्थेने डॉ. सुभाष गुलाबराव खंडारे यांना दिलेल्या नियुक्तीच्या प्रस्तावास मान्यता नाकारली आहे.
शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात गेल्या एक वर्षभरापासून प्राचार्याचे पद रिक्त आहे. या पदावर डॉ. सुभाष खंडारे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी निवड समितीच्या शिफारशीवरून अमरावती विद्यापीठाला पाठवला होता. डॉ. सुभाष खंडारे हे राळेगावला प्राचार्य असताना त्यांच्याविरुद्ध आíथक अफरातफर, बेकायदेशीर कृत्य, गंभीर गरवर्तन, बनावटी व बोगस कागदपत्रे तयार करणे असे गंभीर आरोप होते. अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या पूर्व परवानगीने राळेगावच्या संस्थेने डॉ. खंडारे यांना सेवामुक्त केले होते.
शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक पात्रतेशिवाय नतिक मूल्यांची जोपासनाही महत्त्वाची आहे, असे  उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन डॉ. खंडारेंसारख्या फौजदारी गुन्ह्य़ाचे आरोप असलेल्या व राळेगावच्या कॉलेजने  सेवामुक्त केलेल्या प्राचार्याला दुसऱ्या अन्य महाविद्यालयात अर्थात यवतमाळच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून मान्यता देण्यास अमरावती विद्यापीठाने स्पष्ट नकार दिला आहे.
विशेष हे की, प्राचार्यपदासाठी डॉ. खंडारे यांनी ज्या दिवशी मुलाखत दिली होती व निवड समितीने निवड केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी डॉ. खंडारे प्राचार्य म्हणून रुजूदेखील झाले होते. त्यांनी कारभारही सुरू केला होता. त्यांच्या नियुक्तीला विद्यापीठाची मान्यता मिळायच्या आधीच त्यांचे प्राचार्यपदी रुजू होणे हा देखील उच्च शिक्षण क्षेत्रात चच्रेचा विषय झाला होता. भ्रष्टाचार आणि अनियमितता व बेकादेशीर कृत्याचे आरोप असलेल्या व्यक्तीला प्राचार्यपदी नियुक्ती देणे उचित नसल्याचे सांगत अमरावती विद्यापीठाने डॉ. खंडारे यांच्या नियुक्तीचा संस्थेने पाठविलेला प्रस्ताव फेटाळला आहे. अशा प्रकारची विद्यापीठातील ही पहिलीच घटना असल्याचे समजते.