शहरातील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट, इनडोअर हॉकी असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशन, नेटबॉल असोसिएशन, दि नाशिक जिल्हा तायक्वांदो, रोपजम्प असोसिएशन, डॉजबॉल, तलवारबाजी, टग ऑफ वॉर, टेनिस बॉल यांसह विविध क्रीडा संघटनांच्या वतीने ‘सुवर्णकन्या’ अंजना ठमकेचा सत्कार करण्यात आला.
अंजना व प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचा तसेच इनडोअर हॉकी असोसिएशनच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. या वेळी सिंग यांनी अंजना, कविता राऊत, मोनिका आथरे यांसारख्या काही मुलींचे प्रशिक्षण सध्या सुरू असल्याची माहिती दिली. भारताला आशियाई तसेच ऑलिम्पिकसारख्या क्रीडा महोत्सवात यापुढे नक्कीच अधिक पदके मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह आदी उपस्थित  होते. या वेळी एकलव्य अकॅडमीच्या क्रीडापटूंची साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये नियमितपणे मोफत शारीरिक तपासणी व इतर चाचण्या करून त्यांच्या तब्येतीविषयी काळजी घेतली जाईल, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले. डॉ. विनोद चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल पाटील यांनी आभार मानले.
‘ज्योती’च्या कुस्तीगीराचे यश
पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयातील कुस्तीगीराने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांची विभागीय पातळीसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी महेश पाटील, गोरखनाथ बलकवडे यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेच्या विविध वयोगटांत कुणाल गाढवे, योगेश थोरात, सोमनाथ गांगुर्डे, मयूर भालेराव विजेते ठरले. तसेच शिशुविहार बालक मंदिर येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून १७ वर्षे वयोगटात प्रशांत नागरे याची नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. खेळाडूंना क्रीडा शिक्षक अण्णासाहेब शिरोळे व आर. के. कापडे यांचे मार्गदर्शन लाभले.
‘शिवसत्य’चा उपक्रम
नाशिक येथील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या वतीने टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० खेळाडूंना ऑलिम्पिकमधील सामन्यांची सीडी वितरित करण्यात आली. खेळाडूंनी सरावाबरोबरच सीडी बघून अधिकाधिक सुधारणा करावी, या हेतूने शिवसत्याच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश ढोली, क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे, मकरंद देव, आदित्य सातोस्कर आदींचे सहकार्य लाभले.
स्पीडवेल एज्युस्पोर्टसमध्ये स्पर्धा
स्पीडवेल एज्युस्पोर्टसमध्ये क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. धावणे, अडथळ्यांची शर्यत आदींचा समावेश होता. यात इशांत पाटील, वैष्णवी मुसळे, गणेश धोंगडे, संस्कृती मते, शुभम बोडके, साक्षी मुर्तडक, प्रसाद कातोरे, प्रथमेश मुसळे, यश हगवणे, हरीश चव्हाणके, पुष्कर ढोन्नर, सह्य़ाद्री हाडके यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रश्नमंजूषेचे आयोजन क्रीडा शिक्षिका अपूर्वा कंठे यांनी केले.
वाघ तंत्रनिकेतनचे यश
क. का. वाघ तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन विभागाच्या माणिक चतुरमुथाने महाराष्ट्र राज्य अॅक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित जलतरण स्पर्धेत ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि १५०० मीटर या प्रकारांमध्ये दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळविले.
‘नाशिप्र’तर्फे बुद्धिबळ स्पर्धा
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिंदु रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात पुणे विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धा झाली. स्पर्धेचे आयोजन सचिव प्रा. योगेंद्र पाटील यांनी केले. उद्घाटन पुणे विद्यापीठाचा माजी खेळाडू प्रशांत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य उदय शेवतेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी माजी विद्यापीठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात आल्या. स्पर्धेत पुणे शहर विभागाने विजेतेपद, तर अहमदनगर विभाग उपविजयी झाला.