आयआरबी कंपनीने मंगळवारी सायंकाळी २० कोटी रूपयांची बँक गॅरंटी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे सादर केली. याचबरोबर उर्वरित कामांची यादीही त्यांनी सोबत जोडली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना आयआरबी कंपनीला संरक्षण पुरविण्याची सूचना केली आहे. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर शहरात कोणत्याही क्षणी टोल आकारणी होण्याची चिन्हे स्पष्टपणे जाणवू लागली आहेत. दरम्यान, आज टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयआरबी कंपनीने प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम चुकविली असतांनाही कारवाई न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्याबाबत २३ मे रोजी सर्वसमावेशक बैठक होणार आहे.     
कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्ते आयआरबी कंपनीने केले आहेत. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याकारणावरून टोलविरोधी कृती समितीने टोल आकारू देणार नाही, अशी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे.तर शासकीय पातळीवर टोल आकारणीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आयआरबी कंपनीच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन टोल आकारणी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, शासनाने आयआरबी कंपनीकडे २० कोटी रूपयांची बँक गॅरंटी मागितली होती.     
या पाश्र्वभूमीवर आयआरबी कंपनीचे अधिकारी श्री.अब्राहम व सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन बँक गॅरंटी सुपूर्त केली. जिल्हाधिकारी माने यांनी आयआरबी कंपनीकडे उर्वरित कामांची यादी गतवेळी मागितली होती. ती सुध्दा आज सायंकाळी माने यांच्याकडे सादर करण्यात आली. टोल आकारणी सुरळीत व्हावी यासाठी टोल नाक्यांच्या ठिकाणी पोलीस संरक्षण पुरविण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे. या घडामोडी पाहता  कोल्हापुरात कधीही टोल आकारणी होणार असे चित्र निर्माण झाले आहे.    
दरम्यान, या संदर्भात टोलविरोधी कृती समितीने आपली आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवली आहे. शासनाने व आयआरबी कंपनीने टोल आकारणीसाठी जे करायचे आहे ते करावे आम्ही मात्र टोल आकारणी हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया बाबा इंदूलकर यांनी व्यक्त केली.