कायद्यामध्ये होणाऱ्या बदलांबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता असून संदर्भातील माहिती कायदेविषयक परिसंवादातून सहजतेने उपलब्ध होऊ शकते. वकील तसेच न्यायाधीशांना देखील आपले ज्ञान व माहिती संकलन करण्याचा हा सोपा मार्ग असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सातारा ए. डी. उपाध्ये यांनी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या कायदेविषयक परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी केले. नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर या प्रसंगी उपस्थित होते.
महाबळेश्वर नगरपरिषद सभागृहात आयोजित केलेला परिसंवाद २४ मार्चअखेर असून त्यासाठी जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एम. कोसमकर, पी. पी. जोशी, एन. के. मोरे उपस्थित होते. वकील वर्गाने आपले काम करत असताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून सामाजिक भावनेतून आपले काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हा न्यायाधीश उपाध्ये यांनी नमूद करून वकील व्यवसाय करताना कायद्यासंदर्भात आपले ज्ञान परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे, असे सांगितले. नवीन कायदे व झालेले बदल अमलात आणण्यासाठी परिसंवादातून योग्य दिशा घ्यावी असा सल्ला देऊन कायदेविषयक सल्लागार समितीने आर्थिक गरजूंना योग्य मदत करून न्यायव्यवस्थेबाबत सर्वसामान्यांमध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
परिसंवादात महिला व बालके यांच्या संदर्भातील कायदा या बाबत प्रसिद्ध वकील धैर्यशील पाटील यांचे व्याख्यान झाले. न्यू लॉ कॉलेज माहीम मुंबईचे प्राचार्य अॅड. एन. एम. राजाध्यक्ष यांचे स्पेसिफिकेशन रिलीफ अॅक्ट या विषयावर तर बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाचे सदस्य अॅड. शिवाजीराव चव्हाण यांनी सोशल जस्टीस अँड रोल ऑफ अॅडव्होकेट्स या विषयावर विवेचन केले. रविवार, दि. २४ रोजी प्रॉटेक्शन ऑफ वूमेन फ्रॉम डोमेस्टीक व्हायोलेन्स अॅक्ट २००५ या विषयावर अॅड. राजेंद्र अनभुते, पुणे येथील भारती विद्यापीठाचे डीन अॅड. मुकुंद सारडा यांचे रिलेव्हन्सी ऑफ कॉन्स्टीटय़ूशन इन ट्रायल कोर्ट प्रॅक्टीस याविषयावर तर हिंदू लॉ या बाबत सांगलीचे जिल्हा सरकारी वकील सी.डी. माने यांची व्याख्याने होणार आहेत.
सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत केंजळे, उपाध्यक्ष अॅड. किरण शहा, पदसिद्ध उपाध्यक्ष अॅड. विकास पाटील, अॅड. सयाजीराव घाडगे, अॅड विजय देशमुख, अॅड नंदिनी घोडके यांच्यासह जिल्ह्य़ातून सुमारे ३०० वकील परिसंवादास उपस्थित आहेत.