कनिष्ठ महाविद्यालय गणित परिषदतर्फे थोर भारतीय गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांचे ९००वे जन्मशताब्दी वर्ष कमला नेहरू महाविद्यालयात साजरे करण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरसेवा मंडळाचे सचिव अ‍ॅड. अभिजित वंजारी,  मुख्य अतिथी ज्येष्ठ गणित तज्ज्ञ डॉ. टी.एम. करडे आणि एस.चंद्र आणि कंपनी नवी दिल्लीचे उपाध्यक्ष व पुरस्काराचे प्रायोजक डॉ. बी कौशिक, श्रीराम चव्हाण, डॉ. अरविंद शेंडे, दीपक कडू आदी व्यासपीठावर उपस्थित होते. भास्कराचार्याचा लीलावती हा गणित ग्रंथ लोकप्रिय असून त्यांनी गणित मनोरंजक करून कसे शिकवावे याचा एक आदर्श नमुना सादर केला, असे डॉ. श्रीराम चौथाईवाले यांनी सांगितले. गेल्या सहाशे वर्षांपासून भास्कराचार्याचे लीलावती आणि बीजगणित हे ग्रंथ पूर्ण भारतभर गणित शिकवण्याची पाठय़पुस्तके म्हणून वापरली जातात, असेही प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान परिषदेच्या संकेत स्थळाचे उद्घाटन डॉ. मुक्तीबोध यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दीपक कडू यांनी जीवनगौरव, प्रा. बालकृष्ण मापारी यांनी उत्कृष्ट गणित शिक्षक पुरस्कार, प्रा. सूर्यकांत भोंगळे यांना काशीबाई करडे स्मृती गणित शिक्षक पुरस्कार, प्रा. अरविंद जोशी यांना कौशल्याबाई सास्ते स्मृती गणित पुरस्कार तर विशेष गौरव पुरस्कार प्रसिद्ध समाजसेवक डॉ. भगिरथ कौशिक यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद शेंडे यांनी तर संचालन प्रा. कल्पना मोहोड यांनी केले. डॉ. माधवी खंडाईत यांनी आभार मानले.