० पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
० महापालिकेतील कथित भ्रष्टाचार ठरणार केंद्रिबदू
० आचारसंहितेविषयी प्रश्नचिन्ह
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेनेत दाखल झालेले ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्या प्रभागात येत्या ८ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीचे बिगूल वाजले आहे. पालकमंत्री नाईक आणि मोरे या दोघांसाठीही प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या या निवडणुकीत शेजारच्या प्रभागातील मतदारांची नावे घुसवली गेल्याने प्रभागातील प्रश्नाऐवजी या ‘बोगस’ मतांचीच चर्चा या भागात प्रचाराचा केंद्रिबदू ठरू लागली आहे.
वाशीतील सुशिक्षित मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेक्टर सहा ते आठ परिसरात होणाऱ्या या पोटनिवडणुकीत लागू झालेली आचारसंहिता केवळ प्रभागापुरती मर्यादित ठेवण्यात आल्याने शहरातील इतर भागांमध्ये मात्र विकासकामांचा रतीब मांडणे सत्ताधाऱ्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेची नियमावली काहीशी वादग्रस्त ठरण्याची शक्यता अधिक आहे.
कचरा वाहतुकीच्या सुमारे २३४ कोटी रुपयांच्या वादग्रस्त कंत्राटाविरोधात जाहीर भूमिका घेत महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा विठ्ठल मोरे यांनी चार महिन्यांपूर्वी वाचला होता. तेव्हाच त्यांचा शिवसेनेच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याची चर्चा होती. दोन महिन्यांपूर्वी ही औपचारिकता पूर्ण झाली असली तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीत महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजेल, असे चित्र दिसू लागले होते. ‘रोडमॅप’ या टोपणनावाने कंत्राटी कामांमध्ये सुरू झालेली टक्केवारीची वसुली सध्या महापालिका वर्तुळात चर्चेत असून या पाश्र्वभूमीवर विठ्ठल मोरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने वाशीतील पोटनिवडणुकीत या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजेल, असेच चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर वाशी सेक्टर चार आणि पाच परिसरातील मतदारांची नावे पोटनिवडणूक जाहीर झालेल्या प्रभागात घुसवली गेल्याने या नावांची अफरातफर कोणी घडवली यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कलगीतुरा सुरू झाला आहे. एकीकडे नावांच्या अफरातफरीची चर्चा केंद्रस्थानी असताना दुसरीकडे पोटनिवडणूक होत असलेल्या प्रभागापुरती आचारसंहिता लागू करून निवडणूक आयोगाने नव्या वादाला तोंड फोडले आहे.  वाशी सेक्टर सहा ते आठ या विभागांपुरतीच आचारसंहिता लागू करताना अगदी शेजारच्या प्रभागात विकास कामांचा तसेच लोकप्रिय घोषणांचा रतीब मांडणे सत्ताधाऱ्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे या विकासकामांचा प्रभाव पोटनिवडणूक होत असलेल्या प्रभागावर पडणार नाही का, असा सवाल शहरातील राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार
नवी मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारविरहित करणार, अशी घोषणा करत अडीच वर्षांपूर्वी गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीत एकहाती विजय संपादन केला. असे असले तरी महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये टक्केवारीची हवा जोरात सुरू झाल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली असून विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेने हे आरोप करत सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
‘माझ्या नगरसेवकांना सुपारीचे खांडसुद्धा खाऊ देणार नाही’, अशी भाषा करणारे पालकमंत्री विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या या आरोपांना पोटनिवडणुकीत कसे उत्तर देतात याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. मोरे यांच्या राजीनाम्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा वाजविण्याची तयारी करण्यात आली आहे.
 या आरोपांना उत्तर देत मोरे यांना पोटनिवडणुकीत धूळ चारण्याचे बेत राष्ट्रवादीत आखले जात असून मोरे यांना घरच्या मैदानात धूळ चारण्यासाठी या भागातील माजी अपक्ष नगरसेविका विजया ठाकूर यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे.