ठाण्यातील लुईसवाडी भागातील एका हॉटेलमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्डकप भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तीन जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. धीरज हॉटेलध्ये मीरा रोड व अंधेरी येथे राहणारे कमलकुमार जैन, प्रकाश शहा आणि दिलीपकुमार जैन हे शनिवारी दुपारी भारत-पाक क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकल्यावर हे तिघे खुशालभाई यांच्याशी मोबाइलवर संपर्क करून सट्टा खेळत असल्याचे आढळून आले.