चालत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ बनवून प्रवाशांना गरमागरम जेवणाचा आनंद देणाऱ्या ‘स्वयंपाक डब्या’तील (पेण्ट्री कार) कर्मचाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक नवीन योजना आणली आहे. हे कर्मचारी खाद्यपदार्थ बनवताना जमणारा कचरा रेल्वेमार्गावर फेकतात, असे आढळून आल्यानंतर त्यापासून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार वीस किलो कचरा उचलून तो रत्नागिरी किंवा मडगाव येथे जमा करायचा आहे. या प्रत्येक २० किलो कचऱ्याच्या थैलीमागे कर्मचाऱ्यांना ५० रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात केल्यावर रेल्वेने त्याबाबत पुढाकार घेतला होता. स्थानक स्वच्छता मोहिमेपासून ‘एक दिवस एक स्थानक’ अशा अनेक योजनाही रेल्वेने राबवल्या. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. कोकण रेल्वे महामंडळाने मात्र याबाबत आघाडी घेतली आहे.
‘स्वयंपाक डब्या’तील कर्मचारी अनेकदा या डब्यातील कचरा बिनदिक्कतपणे रेल्वेमार्गावर फेकताना दिसतात. त्यामुळे रेल्वेमार्ग खराब होतोच, पण उंदरांचा वावरही वाढतो. अनेकदा हे उंदीर महत्त्वाच्या तारा कुरतडतात. परिणामी बिघाडही होतो. हे टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कचरा फेकण्यापासून परावृत्त करणे आवश्यक होते. त्यासाठी कोकण रेल्वेने ही नवीन योजना आणल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले.
या योजनेनुसार कोकण रेल्वेतील ‘स्वयंपाक डब्या’तील कर्मचाऱ्यांना या डब्यातील कचरा गोळा करायचा आहे. प्रत्येक २० किलो कचऱ्याच्या पिशवीमागे या कर्मचाऱ्यांना ५० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र हा कचरा गोळा करताना भाजीचे देठ, कागद आदी नैसर्गिकरित्या विघटन होणारा आणि प्लॅस्टिकसारखा विघटन न होणारा, असा वेगळा करावा लागणार आहे. रत्नागिरी आणि मडगाव येथे जैविक कचऱ्यासाठी यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे या जैविक कचऱ्यापासून खत तयार करण्यात येईल. तर इतर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, असे पतंगे यांनी स्पष्ट केले.