संपाची हाक देणाऱ्या कामगार संघटनांना नमविण्यासाठी बेस्टचे तत्कालीन महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी हट्टाने आणि प्रवाशांचा कोणताही विचार न करता सेवेत घेतलेल्या ५१ रंगआंधळ्या बसचालकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या चालकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता त्यांना चालकाऐवजी क्लिनर म्हणून काम करावे लागणार आहे.
बेस्टमधील कर्मचारी-कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी २००७ मध्ये संपाची हाक दिली होती. संप मोडून काढण्यासाठी त्यावेळचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी घाईगडबडीत फारशी परीक्षा न घेताच सुमारे साडेतीन हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली होती. या चालकांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये ५१ जणांना रंगांधळेपणा असल्याचे उघडकीस आले. मात्र आपल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्याची सूट त्यांना देण्यात आली. या ५१ जणांनी आपण रंगांधळे नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून सादर केले आणि सर्वसामान्य प्रवाशांची कोणतीही पर्वा न करता उत्तम खोब्रागडे यांनी बेफिकीरपणे त्यांना बसचालक म्हणून सेवेत घेतले. खोब्रागडे यांच्यानंतर महाव्यवस्थापक झालेल्या ओमप्रकाश गुप्ता यांनी या बसचालकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यात हे ५१ चालक रंगआंधळे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. वास्तविक अशा रंगांधळ्या चालकांच्या हाती मुंबईत बस देणे धोक्याचे होते. त्यामुळे या ५१ जणांना तात्काळ कामावरून कमी करण्यात आले. नोकरी गेल्यामुळे या चालकांचे संसार रस्त्यावर आले. काही जणांच्या मुलांच्या शिक्षणाचीही परवड होऊ लागली. नोकरी वाचविण्यासाठी या चालकांनी राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे उंबरठेही झिजवले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
विद्यमान कामगार संघटनांना नमविण्यासाठी उत्तम खोब्रागडे यांनी हट्टाने या रंगांधळ्या चालकांना कामावर घेतले होते. त्याच चालकांना आता ‘बेस्ट वर्कर्स युनियन’चे दरवाजे ठोठवावे लागले. युनियननेही माणुसकीच्या नात्याने एक प्रयत्न म्हणून ओमप्रकाश गुप्ता यांना बैठक घेण्याची विनंती केली. युनियनचे अध्यक्ष उदय आंबोणकर यांनी या बसचालकांच्या कुटुंबाची हलाखीची स्थिती महाव्यवस्थापकांपुढे मांडली. अखेर ओमप्रकाश गुप्ता यांनीही सकारात्मक भूमिका घेत ‘अन्य कुठले काम करण्यास हे चालक तयार आहेत का?’ असा सवाल केला आणि युनियनने तात्काळ होकार दिला. तीन दिवसांपूर्वी या सर्व चालकांना बेस्टच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते. त्यांनी आपले चालकपदाचे बॅज बेस्टकडे सादर केले असून त्यांना आता क्लिनर म्हणून बेस्टच्या सेवेत घेण्यात आले आहे.
सेवेतून काढलेल्या या चालकांची सेवा खंडित न करता त्यांना क्लिनर पदावर कार्यरत करावे. म्हणजे निवृत्तीच्या वेळी त्यांना फायदा होऊ शकेल. यासाठी कामगार संघटना आता प्रयत्नशील आहे.