‘टँकरमागे पळे यशोदा, पाण्यासाठी कृष्ण रडे’, ‘अरे बापरे, विद्यार्थी प्रॉडक्ट होतोय’, ‘माणुसकीचा मळा अर्धाच फुलला’, ‘परिवर्तनाचे चक्र अर्धेच फिरले आहे- फिरविण्यासाठी धुरंधराची गरज आहे’ हे चार विषय या वर्षी मराठवाडय़ाचा युवा वक्ता या स्पर्धेसाठी ठरविण्यात आले आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात येते. ७ जानेवारीला या स्पर्धेची जिल्हानिहाय फेरी होणार असून १२ जानेवारीला महाअंतिम फेरी होणार आहे.
मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वाक्कौशल्य आहे. केवळ व्यासपीठाअभावी विद्यार्थ्यांना विचार मांडता येत नाही. त्यामुळे हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ७ जानेवारीला औरंगाबाद येथील स्पर्धा देवगिरी महाविद्यालयात, जालना-जेईएस महाविद्यालयात, बीड-बलभीम महाविद्यालय, उस्मानाबाद-तेरणा महाविद्यालय, नांदेड-यशवंत महाविद्यालय, लातूर-महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, हिंगोली-आदर्श महाविद्यालय, परभणी-कमलताई जामकर महिला महाविद्यालय येथे या स्पर्धा होणार आहेत.  जिल्हास्तरावरील विजेत्यांना अनुक्रमे तीन, दोन व एक हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. आठही जिल्हय़ांतील २४ विजेत्या स्पर्धकांना औरंगाबाद येथे महाअंतिम फेरीसाठी बोलाविण्यात येणार असून, देवगिरी महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी ‘महाराष्ट्रातील इतिहासातील सुवर्णपान-यशवंतराव चव्हाण’, ‘माध्यमक्रांतीचा भस्मासुर आणि वस्तुस्थितीची ऐंशीतैशी’, ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘ओ माय गॉड-देवाच्या देव्हाऱ्यात दलालांचा सुळसुळाट’ हे विषय ठेवण्यात आले आहे. महाअंतिम फेरीतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना १५, १० व ५ हजारांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. ही स्पर्धा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असून एका महाविद्यालयातून फक्त तीन विद्यार्थ्यांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.