कारागृहात असलेल्या एका कुख्यात गुंडासाठी खंडणी मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद राजेंद्र विश्वकर्मा (रा. जगनाडे चौक) याने व्यंकटेशनगरात गाळे विकत घेऊन ऑरेंजसिटी वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये अनेकांनी रक्कम गुंतविली. त्यात चौऱ्या बेडेकर यांनीसुद्धा ८० हजार रुपये गुंतवले होते. ही रक्कम परत मागण्यासाठी चौऱ्या बेडेकर यांनी आरोपी बब्बू पठाण व कलीमखान शामतखान पठाण यांना एक लेखी पत्र देऊन १० सप्टेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास कंपनीच्या व्यंकटेशनगरमधील कार्यालयात पाठविले. कलीमने कार्यालयात गेल्यावर कबाडीचा व्यवसाय असल्याची तसेच तो हद्दपार असल्याचा परिचय करून दिला. तेथे कंपनीचा संचालक प्रमोद विश्वकर्मा याला ‘पैसे दे’, असे म्हणून ते दोघे निघून गेले. आरोपी पुन्हा तेथे गेले असता त्यांना ८० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
काल बुधवारी आरोपी बब्बू पठाण पुन्हा त्या कार्यालयात गेला. कलीमखान पठाणला कारागृहातून सोडवायचे असल्याचे सांगत त्यासाठी ४० हजार रुपये मागितले. ‘ते दिले नाही तर आम्हाला चाकू लावून पैशाची वसुली करता येते’, अशी धमकी त्याने कंपनीचा संचालक प्रमोद विश्वकर्मा याला दिली. जाताना तेथील दूरचित्रवाणी संच फोडून टाकला. याप्रकरणी बब्बू व कलीम या दोघांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी कलीम हद्दपार असून त्याला काही दिवसांपूर्वी एका खंडणी प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती आणि तो सध्या कारागृहात आहे. त्याच्या विरुद्ध खंडणी व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी बेडेकर यांनी अशा गुंडांना का पाठविले, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
भाडेकरूच्या अठरा वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एका घर मालक आरोपीविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या मुलीची आई १० डिसेंबर २०११ रोजी काही कामानिमित्त जळगावला गेली होती.
घरमालक आरोपी सुशीलने त्या मुलीला व तिच्या लहान भावाला घरी झोपण्यास बोलावले. सर्व झोपले असताना मध्यरात्री त्याने तिचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. १ ऑक्टोबर २०१४ रोजी तिने जरीपटका पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.