साखरेची पोती घेऊन निघालेली मालमोटार पुढचे चाक निखळल्याने उलटली गेली. या वेळी गाडीसह साखरेच्या अवजड पोत्यांखाली रस्त्याकडेला उभी असलेली इंडिका मोटार दबली गेली. या दुर्घटनेत मोटारीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील आंबेडकर चौकात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
अनिल भुजंगराव लोखंडे (वय ३८, एन ४, सिडको, औरंगाबाद) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अनिल हा सकाळच्या वेळी या चौकाजवळ रस्त्याकडेला मोटार पार्क करून मोटारीत बसून मित्रांची वाट पाहात होता. हे सर्व जण भोकरदन तालुक्यातील राजूरला देवदर्शनासाठी जाणार होते. याच वेळी साखरेची पोती भरून मध्य प्रदेशात निघालेल्या भरधाव मालमोटारीचे (एमपी ०६ एससी ०६५८) पुढच्या बाजूचे डावीकडील चाक अचानक निखळून पडले. गाडी वेगात असतानाच हा प्रकार घडल्याने साखरेच्या पोत्यांसह मालमोटारीचे अवजड धूड रस्त्याकडेला उभ्या असलेल्या इंडिका मोटारीवर (एमएच १६आर २३६३) कोसळले. या वेळी इंडिकामध्ये अनिल बसला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनिलला बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. ओझ्याखाली दबला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. साखरेची पोती हलवण्यात बराच वेळ गेला. तसेच मालमोटार हटवतानाही बरीच कसरत करावी लागली. तीन क्रेन आणूनही मालमोटार दूर करणे अवघड झाले होते. अखेर साखरेची पोती एकेक करून काढण्यात आली व नंतरच क्रेनच्या साहाय्याने मालमोटार बाजूला घेण्यात आली. मात्र, मालमोटार व साखरेच्या पोत्याखाली इंडिका मोटार पुरती दबली गेली होती. इंडिकाचा पूर्ण चुराडा झाला. त्यात अडकलेला अनिलचा मृतदेह बाहेर काढतानाही मोठी मेहनत घ्यावी लागली. या दरम्यान या रस्त्यावर वाहतूक मोठय़ा प्रमाणात खोळंबली गेली होती. त्यात बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. मालमोटार उलटली गेल्यावर तिचा चालक पळून गेला. अनिलचा मित्र भरत गोपीनाथ पाडळे (वय ३५, पिसादेवी, औरंगाबाद) याने फिर्याद दिली. सिडको पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद केली.
काळाने डाव साधला!
मिळालेल्या माहितीनुसार अनिल लोखंडे व त्याचे शहरातील काही मित्र गुरुवारी चतुर्थीचा योग साधून भोकरदान तालुक्यातील राजूर (जिल्हा जालना) येथे गणपती दर्शनाला जाणार होते. आंबेडकर चौकात अनिल त्याच्या मित्रांची वाट पाहण्यासाठी म्हणून रस्त्याच्या कडेला इंडिका पार्क करून गाडीतच बसून होता. मात्र, देवदर्शन घडणार नव्हते. वाटेतच काळाने डाव साधला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2013 रोजी प्रकाशित
साखरेच्या मालमोटारीखाली दबून इंडिकाचा चुराडा, तरुणाचा मृत्यू
साखरेची पोती घेऊन निघालेली मालमोटार पुढचे चाक निखळल्याने उलटली गेली. या वेळी गाडीसह साखरेच्या अवजड पोत्यांखाली रस्त्याकडेला उभी असलेली इंडिका मोटार दबली गेली. या दुर्घटनेत मोटारीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
First published on: 22-11-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crumble of indica motor down under sugarcane motor one died