शहरात डेंग्युच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी धूर फवारणी आणि धुरळणी सुरू असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी साचलेली अस्वच्छता दूर करण्याचा प्रयत्न म्हणून अशी ठिकाणे शोधून त्याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यावर भर दिला जात आहे. जिल्हयात आतापर्यंत डेंग्युने सहा जणांचा बळी घेतला असून ग्रामीण भागात डेंग्युविरोधात प्रबोधन करण्यात येत आहे.
दिवाळीची धामधूम आटोपली असली तरी शहरात स्वच्छतेच्या कामाला हवी तशी चालना अद्यापही मिळालेली नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा झाल्याचे दृश्य दिसत आहे. हे ढिग हटविण्यासाठी गंभीरपणे उपाययोजना करण्याऐवजी आरोग्य विभागाकडून सोयीस्कर भूमिका घेतली जात आहे. याबाबत प्रत्यक्ष महापालिकेच्या प्रभारी आयुक्तांनी दणका दिल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. रोगांची साथ आणि नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा यांनीही ठिकठिकाणी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी अचानक दौरे काढण्यास सुरूवात केली. त्यांनाही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा आणि मुक्त कारभाराचा प्रत्यय आला. शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे, अशी ठिकाणे शोधत महापालिकेच्या वतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात सायंकाळच्या सुमारास धूर फवारणी आणि धुरळणी करण्यात येत आहे. खासगी तत्वावर देण्यात आलेल्या कामाची मुदत संपल्याने पुढील महिन्यापर्यंत ही मुदत वाढविण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात डेंग्युसदृश्य तसेच डेंग्युच्या रुग्णांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत १२ रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले. शहरात ही स्थिती असताना ग्रामीण भागात मात्र परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. मालेगाव, सटाणा, चांदवड, इगतपुरी, सिन्नर, निफाड, नांदगाव या ठिकाणी आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
तसेच ठिकठिकाणी पथनाटय़, फलक या माध्यमातून जनजागृती सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. उदय बर्वे यांनी सांगितले. जिल्ह्यात डेंग्यु आजाराचा आढावा घेतला असता २१ ठिकाणी १५८ रुग्ण डेंग्युसदृश्य आजाराचे आढळून आले असून ६३ रुग्णांना डेंग्युची लागण झाली आहे. त्यापैकी सहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.