कीर्तन हे परमेश्वराच्या भक्तीचे प्रभावी माध्यम आहे. यातूनच परमेश्वराची स्तुती करता येते. परमेश्वराच्या भक्तीतूनच जीवन उद्धारण्याचा मार्ग मिळतो म्हणून भक्तीमार्गाची कास धरून वाटचाल करा, असे पुण्याचे कीर्तनकार नरहरीबुवा अपामार्जने म्हणाले. येथील प्रमिलाताई ओक सभागृहात नारदीय कीर्तन महोत्सव सुरू आहे त्यात ते बोलत होते.
आपल्या कीर्तनातून त्यांनी भक्तीचा महिमा विषद केला. कीर्तन हे समाज प्रबोधनाचे जसे प्रभावी माध्यम आहे तसेच या माध्यमातून ईश्वराची भक्ती करता येते, असे सांगूून त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून संतांच्या अभंगांची वचने देत भक्तीचे महत्व पटवून दिले. संत मीराबाई यांचे उदाहरण देऊन त्यांनी भक्ती कशी करावी व असावी, ते सांगितले. भक्तीमुळे जीवाचा उद्धार होतो व परमेश्वर प्राप्ती होते, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
या कीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफतांना नागपूरचे कीर्तनकार दिगंबर बुवा नाईक म्हणाले, नरदेहाचे सार्थक फक्त परमेश्वर प्राप्तीतच आहे. कस्तुरीमृगापासून कस्तुरी मिळते, देवगाईच्या शेपटीपासून चवऱ्या बनतात, गाईपासून पंचगव्य मिळते, तर पशूपासून कातडे मिळते, पण नरदेहापासून काहीच प्राप्त होत नाही. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ज्ञानेश्वरीतील अभंगांचे निरुपण केले. संतांनी नरदेहाला घोंगडीची उपमा दिली असून ही घोंगडी मलीन असल्याने त्यावर संस्कार करून ती भगवंताला अर्पण केली पाहिजे. विवाहाच्या वेळी मुलीला जसे सजवून आणले जाते व मग ती वराला अर्पण केली जाते त्याप्रमाणे आपल्या देहालाही संस्कारित करून परमेश्वराला अर्पण केले पाहिजे, असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन सांगितले.
कलीयुगात सर्वात जास्त महत्व नामजपाला आहे. ते सर्वाना सोपे असल्याने संतांनी नामजपालाच प्राधान्य दिले आहे, असे सांगून हर्षदबुवा जोगळेकर म्हणाले की, नामजपानेच मानवाचा उद्धार होतो. अठरा पगड जातीतील लोकांना संत नामदेवांनी एका झेंडय़ाखाली आणले व त्यांच्या मुखी पंढरीचे नाव दिले त्यातूनच त्यांचा उद्धार झाला. संत नामदेवांचा अभंग नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे या अभंगावर त्यांनी निरुपण केले. परमेश्वराचे नाव कानावर पडल्यावर ते अगदी सहजतेने आपल्याही मुखातून आले पाहिजे. नाम जरी फुकट असले तरी त्याला किंमत नाही असे समजू नका. नामजपातून अखंडपणे, अविरतपणे अमृत मिळते. म्हणूनच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असे संतांनी म्हटले आहे, असे ते म्हणाले.
येथील श्रीब्रह्म चैतन्य धार्मिक सद्विचार सेवा प्रतिष्ठान द्वारा संचालित नाईकवाडे कीर्तन महाविद्यालय व प्रमिलाताई ओक ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडे, उपाध्यक्ष डॉ.शरद कुळकर्णी, सहसचिव डॉ.धनश्री मुळावक र, मनमोहन तापडिया, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रात्यक्षिक कीर्तन परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारे वरिष्ठ पत्रकार व नाटय़ कलाकार राजकुमार उखळकर यांना मधुराबाई देशपांडे स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कीर्तन महाविद्यालयाचे मनोज जहागिरदार व किसन जयस्वाल यांनी बुवांना साथसंगत केली, तर विजय अंधारे यांनी कीर्तनकारांचा परिचय करून दिला. आभार नर्मदा परिभ्रमण करणारे श्रीकांत गोंधळेकर यांनी मानले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘ईश्वरप्राप्तीसाठी भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ’
कीर्तन हे परमेश्वराच्या भक्तीचे प्रभावी माध्यम आहे. यातूनच परमेश्वराची स्तुती करता येते. परमेश्वराच्या भक्तीतूनच जीवन उद्धारण्याचा मार्ग मिळतो म्हणून भक्तीमार्गाची कास धरून वाटचाल करा,
First published on: 20-11-2013 at 08:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotion way is all time great