डोंबिवली परिसरातील भटक्या कुत्र्यांकडून दर महिन्याला एक हजाराहून अधिक नागरिकांना चावे घेतले जातात. गेल्या वर्षभरात १२ हजार ९४६ नागरिकांना भटकी कुत्री चावली आहेत. महापालिका हद्दीत सुमारे २६ हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. त्यामधील सुमारे ९ हजारांहून अधिक कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची प्रक्रिया करण्यात आल्याचा पालिकेचा दावा आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व नियोजन करण्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात दरवर्षी सुमारे साठ कोटींची तरतूद करते. एका खासगी संस्थेतर्फे या भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. असे असूनही भटकी कुत्री नागरिकांचा पिच्छा सोडत नसल्याचे दिसून येते. दक्ष नागरिक संघाचे कार्यकर्ते विश्वनाथ बिवलकर यांनी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत किती नागरिकांना कुत्र्यांनी दंश केला याची माहिती मागविली होती. त्या वेळी दर महिन्याला एक हजाराहून अधिक नागरिकांना कुत्रे चावे घेतात. त्यांच्यावर पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. पालिका या रुग्णांवरील उपचारासाठी शासनाकडून कोणतेही औषध घेत नाही. पालिका स्वत: औषधे खरेदी करते, असे उत्तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सारस्वत यांनी माहिती अधिकारात दिले आहे.
दरम्यान, पालिकेने नेमलेले औषध पुरवठादार वेळेवर औषधे पुरवठा करीत नाहीत, त्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात औषधांचा विशेषत: रेबीज इंजेक्शनचा तुटवडा असतो. गेल्या वर्षी हा प्रकार सातत्याने सुरू होता.
जून ते सप्टेंबर या महिन्यांत कुत्री रस्त्यांऐवजी आडोसा घेऊन बसतात. त्यामुळे या चार महिन्यांत पादचाऱ्यांना कुत्रे चावण्याचे प्रमाण ८०० ते ९०० या प्रमाणात आहे. हेच प्रमाण जानेवारी ते मे, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत एक हजाराहून अधिक असल्याचे दिसते, असे बिवलकर यांनी सांगितले. पावसाळ्याव्यतिरिक्त आठ महिन्यांच्या काळात भटकी कुत्री रस्त्यावर, गल्लीबोळात बसतात आणि नागरिकांना लक्ष्य करतात. गेल्या वर्षभरात विंचूदंशाने १९, सर्पदंशाने ६२ व इतर प्राणी चावून १५ जण बाधित झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
दर महिन्याला एक हजार लोकांना ‘श्वान दंश’
डोंबिवली परिसरातील भटक्या कुत्र्यांकडून दर महिन्याला एक हजाराहून अधिक नागरिकांना चावे घेतले जातात.
First published on: 24-01-2014 at 06:33 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog bite to thousand people in every month