कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्व, उत्तर, दक्षिण नागपूरच्या काही भागात पाणी पुरवठा केला जातो. या भागात वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा करता यावा या दृष्टीने पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी महापालिकेतर्फे कन्हान – कोलार नदीवर बंधारा बांधण्यात येणार आहे. १.८२ कोटीचा हा प्रकल्प असून स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील २४० एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कन्हान नदीतून पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहून जात असते. मात्र, जानेवारी ते जून या कालावधीत अपुरा पाणीसाठा असतो. कन्हान केंद्रातून शहराला बाराही महिने पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कन्हान कोलार नदीवर बंधारा बांधण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाद्वारे प्राथमिक सर्वेक्षण करून घेण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार सेवाकर किंवा अन्य खर्चात बदल झाल्यास त्यानुसार विभागाला मोबदला देण्याचे अधिकार, महापालिका आयुक्तांना करारनामा करण्यासंदर्भात अधिकार देण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली.
जेएनएनयूआरएम अंतर्गत २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात एकूण २४ जलकुंभ प्रस्तावित आहेत. त्यातील २० जलकुंभाची कामे हाती घेण्यात आल्यानंतर मोजके जलकुंभ पूर्ण झाले आहेत. बाबुलबन, नालंदानगर, श्रीनगर, गोरेवाडा या चार जलकुंभाची कामे सुरूच होऊ शकली नाही. या कामाला विलंब झाल्याने जुन्या दरात कामे पूर्ण करण्यास कंत्राटदाराने नकार दिला. या कामासाठी शासनाने चार हफ्ते दिले आहेत. मात्र वाढीव निधीचा भार महापालिकेला उचलावा लागणार आहे. या नुसार अतिरिक्त ७.३६ कोटींचा निधी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. या सोबतच रस्त्याची कामे, भंगार विक्री, मानेवाडा दहनघाटाच्या विकासाच्या प्रस्तावांनाही मंजुरी प्रदान करण्यात आली.
महापालिकेतील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या अंतर्गत कामाचे कंत्राट मुंबईच्या मे. वुडाफन कंपनीला देण्यात आले होते. १० महिन्यात कामे पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र कंपनीला या कालावधीत काम पूर्ण करता आले नाही. यामुळे ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती मात्र कंपनीने कामे केली नाही. यामुळे कंपनीचा करार रद्द करण्याच्या प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करून काम सोडून पळ काढणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा स्वतंत्र प्रस्ताव आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक माळ्यावरील कामाच्या वेगवेगळ्या निविदा काढण्याचे निर्देश यावेळी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांनी दिले. शहरातील अनेक उघडय़ा असलेल्या मेनहोलवर झाकणे नसल्यामुळे त्यासाठी १ कोटी रुपयाची झाकणे तयार करण्यात येणार आहे. पाऊस सुरू होण्याच्या आधी झाकणे खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, महापालिकेची संथगतीने चालणारी गती बघता प्रक्रिया लक्षात घेता पावसाळा झाल्यानंतर ती मेनहोलवर टाकली जाण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2014 रोजी प्रकाशित
पाणीपुरवठय़ासाठी कन्हान-कोलार नदीवर बंधारा
कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्व, उत्तर, दक्षिण नागपूरच्या काही भागात पाणी पुरवठा केला जातो. या भागात वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा करता यावा या दृष्टीने पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी महापालिकेतर्फे कन्हान - कोलार नदीवर बंधारा बांधण्यात येणार आहे. १.८२ कोटीचा हा प्रकल्प असून स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

First published on: 16-07-2014 at 08:58 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Embankment on kanhan kolar river in nagpur