आजपासून अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशास सुरुवात झाली असतांनाच मानांकनप्राप्त व मान्यताप्राप्त महाविद्यालयांबाबत घोळ असल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१४-१५ या सत्रास अभियांत्रिकी शाखेतील प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची आजपासून लगबग सुरू झालेली आहे. स्वायत्त तसेच विद्यापीठ नियंत्रित महाविद्यालये, विद्यापीठातील व विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रवेश अर्ज केंद्रावर सुरू झालेली आहे.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी त्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे म्हणजेच एआयसीटीईचे मानांकनप्राप्त असल्याचा दावा करणे सुरू केले आहे, परंतु हे सर्वथा खोटे आहे. कारण, एआयसीटीई ही मानांकन देणारी संस्था नाही. ही संस्था महाविद्यालयांना केवळ मान्यता देते. मानांकन देण्याचा अधिकार नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन किंवा नॅशनल अॅक्रिडेशन अॅन्ड असेसमेंट कौन्सिल (नॅक) याच संस्थांना आहे. मानांकन व मान्यता यात मूलभूत फ रक आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय मान्यता आवश्यक आहे, पण त्यानंतर दिलेल्या अटींची पूर्तता करून सदर महाविद्यालय सुरू आहे अथवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी नॅक कडे असते. नॅक च्या तपासणीअंतीच मानांकनाचा दर्जा ठरतो, पण काही खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅकचा दर्जा असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढणे सुरू केले आहे. याबाबत पालकांनी दक्ष राहण्याची गरज व्यक्त होते.
मान्यता व मानांकन याबाबत घोळ केला जात असल्याची बाब रातुम नागपूर विद्यापूठाच्या अभियांत्रिकी शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ.डी.के.अग्रवाल यांनी मान्य केली. प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी खुल्या गटासाठी किमान ५० टक्के व मागासवर्गीयासाठी ४५ टक्के गुणांची अट देण्यात आली आहे, पण या अटीबाबतही दिलासा मिळण्याची बाब चर्चिली जात आहे. ही अट थोडी शिथील करण्यात आली असल्याचे बोलले जाते. म्हणजे, खुल्या गटासाठी ४५ टक्के, तर मागासवर्गीयांसाठी ४० टक्के किमान गुण असण्याची शिफोरस तंत्रशिक्षण संचालकांच्या बैठकीत नुकतीच करण्यात आल्याचे ऐकायला मिळाले. मात्र, याबाबत अधिकृत निर्देश आलेले नाहीत. अल्पसंख्यांकांच्या कोटय़ाबाबतही यावेळी थोडा बदल करण्यात आला आहे.
भाषिक किंवा धार्मिक, तसेच अनुदानित किंवा विना-अनुदानित अशा दोन्ही गटातील अल्पसंख्यांक समाजाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाबाबत हा बदल आहे. अल्पसंख्यांक भाषिक संस्थांना प्रथम त्यांच्याच गटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनिवार्य आहे. मात्र, त्यापैकी काही जागा शिल्लक राहिल्यास प्रथम अन्य भाषिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांंना प्रवेश द्यावा लागेल. त्यानंतर अन्य धार्मिक अल्पसंख्यांक गटाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त असून तरीही जागा शिल्लक राहिल्यास शासनाच्या मंजुरीनंतर अशा महाविद्यालयांना भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, असे तंत्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
काही महाविद्यालये प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र महाविद्यालयातून न चालविता शहरातील मोक्याच्या जागी केंद्र थाटून बसले आहेत. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर सहायक तंत्रशिक्षक संचालकांनी ही बाब आज बेकायदेशीर ठरवून अशी केंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयातच सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2014 रोजी प्रकाशित
मानांकनप्राप्त व मान्यताप्राप्त महाविद्यालयांबाबत घोळ
आजपासून अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशास सुरुवात झाली असतांनाच मानांकनप्राप्त व मान्यताप्राप्त महाविद्यालयांबाबत घोळ असल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे
First published on: 24-06-2014 at 07:41 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering admission started