कल्याणजवळील ठाकुर्ली परिसरात विकसित होत असलेल्या गृहसंकुलांसाठी टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे यापरिसरात डोंगरउतारावरुन वाहत येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी निसर्गत:च उपलब्ध असलेल्या वहिवाटा नष्ट होऊ लागल्या आहेत. यामुळे येत्या काळात अतिवृष्टी झाल्यास पूर येण्याची संभावना नाकारता येत नाही अशी भीती स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
या परिसरात उल्हास खोऱ्यातील मलंग पट्टीतीमधील डोंगर उतारावरुन वाहत येणारे पाणी कल्याण आणि डोंबिवली परिसरातील नैसर्गिक नाले तसेच नद्यांच्या प्रवाहातून खाडीला मिळते. पाण्याचा योग्यरितीने निचरा होण्यामध्ये या प्रवाहांची महत्वाची भूमिका असते. वर्षांनूवर्षे प्रवाहाचे हे मार्ग निश्चित असल्याने कितीही पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा योग्य रितीने होत होता. परंतु यापरिसरात गृहसंकुलांची बांधणी करताना प्रवाहांच्या मार्गातच भराव टाकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
कल्याण, डोंबिवली शहरांचा विचार केल्यास उल्हास खोऱ्यातील पाणी उल्हास नदीतून, मलंग पट्टीतील पावसाचे पाणी वालधुनी नदीतून, डोंबिवली एमआयडीसी तसेच २७ गाव परिसरातील पाणी खंबाळपाडा येथील मोकळ्या शेतातून खाडीला मिळत होते. तसेच डोंबिवलीतील मानपाडा, सागाव परिसरातून वाहणारे पाणी या परिसरातील हनुमान मंदिराजवळीलनाल्यातून खाडीला मिळत होते. अशा पाणी निचरा होण्याच्या नैसर्गिक प्रवाहात भव्य अशी गृह संकुले उभी राहत आहेत. कल्याणमधील पत्रीपुल परिसरातून निचरा होणारे पाणी येथील नाले तसेच गटारांमार्फत वाहत होते. अलीकडेच या भागात भव्य गृहसंकुल उभे राहिले आहे. ही गृहसंकुलांचे मातीचे मोठे भराव टाकून उभारण्यात आली आहेत. आता पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने वाहून येणारे सर्व पाणी कल्याण स्थानक परिसर तसेच रेल्वेमार्गात साचून राहते. वालधुनी नदीचे दोन्ही काठ झोपडय़ा तसेच गृहसंकुलांनी टाकलेल्या भरावामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे पाणी शहरामध्ये घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच डोंबिवली एमआयडीसी तसेच आसपासच्या गावामधून येणारे पाणी चोळे, ठाकुर्ली आणि खंबाळपाडा यागावांधील वहिवाटेतून खाडीला मिळत होते. परंतु यापाण्याच्या मार्गात टाकलेल्या भरावांमूळे सर्व पाणी गावात शिरण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली. मानपाडा रस्त्याने डोंबिवलीत प्रवेश करताना डाव्या बाजुला सागाव येथे एक भव्य नैसर्गिक नाला सदृश्य भाग होता. या नाल्यात मोठय़ा प्रमाणात पाण वनस्पती होती. पावसाचे पाणी आजुबाजुच्या चाळी, घरांना धोका न देता खाडीच्या दिशेने वाहत जात होते. परंतु, या नाल्यात आता भव्य गृहसंकुले उभी राहिली आहेत. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातच उभ्या राहिलेल्या या संकुलांना ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, एमएमआरडीएने कोणत्या निकषावर परवानगी दिल्या असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
वाढत्या नागरिकरणामुळे ठाकुर्लीला पुराचा धोका
कल्याणजवळील ठाकुर्ली परिसरात विकसित होत असलेल्या गृहसंकुलांसाठी टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे यापरिसरात डोंगरउतारावरुन वाहत येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी निसर्गत:च उपलब्ध असलेल्या वहिवाटा नष्ट होऊ लागल्या आहेत.
First published on: 21-12-2012 at 11:59 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood dengar in thakurli due to increased civilization