रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त हेमराजसिंग राजपूत, रोटरी क्लबचे अध्यक्ष डी. आर. पाटील, सचिव सरिता नारंग उपस्थित होते. राजपूत यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, असे आवाहन केले. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर योग्य निर्णय घेऊन व आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ध्येय निश्चित केल्यास आयुष्याला योग्य दिशा मिळू शकते, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्तविकात डी. आर. पाटील यांनी रोटरी क्लब मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. त्यात विधवा, परित्यक्ता महिलांचे सबलीकरण करण्यासाठी शिवणकाम प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप, आर्थिक मदत, मोफत सायकलींचे वाटप तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया, अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर, अपंगांसाठी तीनचाकी सायकलींचे मोफत वाटप आदी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. या वेळी क्लबला मोफत वाटपासाठी सायकली उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रमोद अहिरे, जितूभाई ठक्कर, सचिन भट्टड, हिम्मतराव ठाकरे, अवतारसिंग पनफेर, के. आर. देसाई यांचा राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयातील तीन, रिमांड होममधील दोन, बिटको बॉईज हायस्कूलमधील एक, उंटवाडी विद्यालयातील एक, मखमलाबाद महाविद्यालयातील एक, रचना विद्यालयातील एक, या प्रमाणे नऊ विद्यार्थ्यांना या सायकलींचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय अ‍ॅड. अमरजितसिंग गरेवाल यांनी करून दिला. सूत्रसंचालन कॅप्टन सुरेश आव्हाड यांनी केले.