नाशिकच्या सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, संगीत, नृत्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नामवंतांचा ‘रेडिओ विश्वास ९०.८ एफएम’ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आठवणींवर आधारित ‘आठवणी नाशिकच्या’ हा मुलाखतींचा कार्यक्रम या केंद्राने १४ भागांद्वारे सादर केला होता.
हा कार्यक्रम नाशिकच्या कलासंस्कृतीची अनोखी ओळख करून देणारा ठरला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष व रेडिओ विश्वासचे सचिव विश्वास ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात देवकिसन सारडा, कमलाकर वारे, मधुकर झेंडे, श्रीकांत केळकर, नेताजी भोईर, संजीवनी कुलकर्णी, किशोर पाठक, सदानंद जोशी, डॉ. कैलास कमोद या मान्यवरांचा समावेश होता. प्रास्ताविक विश्वास शेरीकर यांनी केले.